पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळेच नांदगावातील अनधिकृत दारूधंदा बंद होत नाही!

अनधिकृत दारू धंदा असो की गुटखा विक्री, मटका, जुगार असो; पोलिसांनी जर ठरविले तर ह्या सामाजिक संतुलन बिघडविणाऱ्या गैरव्यवसायांवर अंकुश ठेऊ शकतात. अन्यथा चिरीमिरीच्या `अर्थ’पूर्ण तडजोडीतून असे गैरधंदे होतच राहणार. एवढेच नाहीतर ह्या गैरधंद्यातून निर्माण होणाऱ्या काळ्यापैशातून राजकीय वरदहस्त संपादन करणे सहजशक्य होते. ह्या अभद्र युतीतूनच गावागावातील सामाजिक आरोग्य व्हेंटिलेटरवर नव्हेतर मृत्युशय्येवर आहे. ह्याचे दुःख होते, संताप येतो. कारण व्यसनाधिनतेमुळे गावागावातील कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. ह्याच गैरधंद्यातून माजलेले समाजकंटक गावाला विकासाकडे नेणाऱ्या व्यक्तींना बदनाम करतात. त्यांना आयुष्यातून उठविण्याचे घृणास्पद प्रकार करतात. हे आम्ही अनुभवले आहे, पाहिले आहे. दारूधंदा करणाऱ्याच्या विरोधात सामान्य नागरिक तक्रार करू शकत नाही. कारण पोलिसांकडे दारूधंद्यावाल्याची `वट’ जास्त असते. एवढेच नाहीतर तो कुठल्यातरी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असतो किंवा त्याचे नातेवाईक पक्षाचे पदाधिकारी असतात. ह्यातून गैरधंदे करणाऱ्यांचे मनोबल वाढते. हे वास्तव जाणून घेतले पाहिजे आणि अशा कुवृत्ती विरोधात संघटितपणे लढले पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिठ्ठा हे दशक्रोशीचे महत्वाचे गाव! येथे गेली अनेक वर्षे गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे विकली जाते. कधीतरी तक्रारी आल्यास कारवाई करण्याचे `नाटक’ पोलिसांकडून सादर केले जाते. काही तासांचे `नाटक’ संपताच पुन्हा मोठ्या दिमाखात आणि जोमात दारूधंदा सुरु होतो. नांदगाव असलदे, आयनल, कोळोशी, तोंडवली, बावशी, बेळणे वगैरे गावांमध्ये गावात दारूविक्री होऊ नये म्हणून सामाजिक जाणीव असणारे ग्रामस्थ नेहमीच प्रयत्न करीत असतात. असलदे गावात एकाही ठिकाणी दारूविक्री होत नाही. पण असलदे गावाच्या वेशीवर म्हणजेच नांदगाव तिठ्ठा – असलदे शिवाजीनगर परिसरात किरकोळ स्वरूपातच नव्हेतर होलसेल स्वरूपात गोवा बनावटीची दारू अनधिकृतपणे विकली जाते. हे `झोरे’सारख्या हवालदाराला- कणकवली पोलिसांना माहित नाही असे नाही. तरीही `अर्थपूर्ण’ तडजोड होत असल्याने ठोस कारवाई होत नाही; असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

ह्याच अनधिकृत दारू धंद्याबाबत ऑगस्ट महिन्यात असलदे गावाचे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी २२ ऑगस्ट २०२३ ला कोणालाही न घाबरता सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना भेटून लेखी निवेदन देऊन पोलीस खात्याचे लक्ष वेधले होते. पण कारवाईचे काही तासांचे `नाटक’ करून स्थानिक पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार करूनही अनधिकृत दारूधंदा बंद होऊ शकत नाही; हे दाखवून दिले. सिंधुदुर्ग पोलीस अधिकक्षकांनी ह्याबाबत कठोर भूमिका घेणे गरजेचं होतं.

पुन्हा ३ ऑक्टोबर २०२३ ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षकांना निवेदन देत अनधिकृत दारू धंदा कायमस्वरूपी बंद करण्याबाबत निवेदन दिले. अन्यथा १९ ऑक्टोबर २०२३ रोजी कणकवली पोलीस स्टेशनला धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या निवेदनाचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने १९ ऑक्टोबर २०२३ रोजी कणकवली पोलीस स्टेशनला धरणे आंदोलन केले. सामान्य नागरिक अशाप्रकारे आंदोलन करू शकत नाही म्हणूनच मग एखाद्या राजकीय पक्षाचे पाठबळ घ्यावे लागते. तसे पाठबळ स्थानिक नागरिकांनी घेऊन अनधिकृत दारू धंदा कायमस्वरूपी बंद करण्याबाबत पोलिसांकडे दाद मागितली आहे. सिंधुदुर्ग पोलीस अधिकक्षक ह्याबाबत आतातरी कठोर भूमिका घेतील; अशी आशा करायला हरकत नाही.

ह्या अनधिकृत दारूधंद्यातून निर्माण झालेल्या काळ्या पैशातूनच पोलिसांचे आणि राजकीय पक्षाचे आशीर्वाद प्राप्त करून घेतले गेले आणि असलदे गावाच्या विकासासाठी पुढे येणाऱ्या ग्रामस्थांना अतोनात त्रास दिला गेला. गावासाठी सदैव कार्य करणाऱ्या व्यक्तींविरोधात आमदार नितेश राणे यांच्याकडे खोट्या तक्रारी करण्यात आल्या. ह्याबाबत सविस्तर लेख लवकरच लिहिणार आहे.

पण आज सिंधुदुर्गातील पोलिसांनी नांदगाव तिठ्ठ्यावर अनधिकृत दारू व्यवसाय असो इतर गैरधंदे असो ते पूर्णपणे संपुष्टात आणलेच पाहिजेत. नांदगाव दशक्रोशीतील सामाजिक सौख्य बिघडता काम नये; ह्याची जबाबदारी जशी पोलिसांची आहे तशी राजकीय पक्षांचीही आहे. अन्यथा गावागावांमधील व्यसनाधिनता वाढणार आहे, गुन्हेगारी वाढणार आहे, कुटुंब उध्वस्त होणार आहेत. मुलींवर-महिलांवर अत्याचार होणार आहेत, चोऱ्या होणार आहेत, हीच माणसं गावाचे पुढारीपण करणार आहेत. त्यांना रोखलेच पाहिजे. अशा व्यक्तींशी कितीही चांगले संबंध – नात्याचे संबंध असले तरी प्रत्येकाने आपली विवेकबुद्धी जागृत ठेवली पाहिजे. तरच गावागावांमध्ये सुखशांती स्थित होईल.

-नरेंद्र हडकर