संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार नारायणराव राणे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. नारायण राणे यांच्या संघर्षमय राजकीय वाटचालीतूनच हे महाराष्ट्राला, कोकणाला, सिंधुदुर्गाला मंत्रीपद मिळाले आहे, त्यामुळे नारायणरावांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन!

हेही वाचा! -प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!

कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद म्हणजे त्या खात्यापुरती का होईना; देशाचे नेतृत्व करण्याची संधी असते. त्या संधीचे सोने नारायण राणे नक्कीच करतील; कारण महाराष्ट्राचे दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे मंत्रीपद सांभाळताना त्यांनी अतिशय चांगले आणि जलद असे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यातच त्यांच्याकडे अचानक महत्वाचे महसूल खाते आले. त्या खात्यातही त्यांनी केलेले कार्य पाहूनच स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. आता पुन्हा त्यांना केंद्रात कॅबिनेट दर्जाचे खाते मोदी सरकारला द्यावे लागले; हा संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय आहे. मधल्या काळात काँग्रेस पक्षात आणि थोड्या काळाकरिता स्वतःचा स्वाभिमान पक्ष काढून नारायण राणे यांनी आपला राजकीय दबदबा निर्माण करून ठेवला. दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत स्वतः पराभूत झाले, त्यांचे सुपुत्र निलेश राणे दोन वेळा लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. तरीही त्यांची राजकीय वाटचाल कोणीही थांबवू शकले नाही. एवढेच काय शिवसेनेत असताना कणकवलीच्या पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत राणेंना अपयश आले होते. अशा प्रत्येकवेळी नारायण राणे यांची वाटचाल संपल्याची बोंब नेहमीच शहरी आणि जिल्ह्याबाहेरील प्रसारमाध्यमांनी मारली. मात्र प्रत्येकवेळी नारायण राणे यांची राजकीय पटावरील गुणवत्ता सरस ठरली.

हेही वाचा! -आमदार नितेश राणे अभिनंदन! अधिकाऱ्यावर वचक ठेवायलाच हवा!

नारायण राणेंकडे केंद्रीय मंत्रीपद हे काही सहजासहजी चालून आले नाही. हा एक यशस्वी राजकीय संघर्ष आहे; असे आमचे स्पष्ट म्हणणे आहे. आक्रमकपणा, अभ्यासू वृत्ती आणि आपल्या भागातील विकासाला दिलेले प्राधान्य ह्या बाबींवर राजकीय नेतृत्वाची कसोटी पणाला लागलेली असते आणि जो ह्या कसोटीमध्ये यशस्वी होतो; त्या राजकीय व्यक्तीला राजकीय पक्षांना आपल्या पक्षांमध्ये वरच्या स्थानावर ठेवावे लागते; ही त्या राजकीय पक्षाची गरज असते सत्ता भक्कम करण्यासाठी!

हेही वाचा! -जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?

आता राहिला कोकणच्या विकासाचा प्रश्न! कोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्ग गेले कित्येक वर्ष जीर्ण-अरुंद अवस्थेत होता. हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. मागील दहा वर्षे त्याचे अडखळत काम सुरु आहे. त्या कामाची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे आणि प्रवास कसा सुखकर होईल? त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोमात गेलेली आरोग्य यंत्रणा सुद्धा सुधारणे आवश्यक आहे. रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि शेती व फलोद्यान विकास ह्या मुद्द्यांवर कोकणात विशेषतः सिंधुदुर्गात खूप काम व्हायला हवे. ग्रामीण भागात गोवा बनावटीचे चोरटी दारू प्रत्येक गावागावात विकली जाते. तरीही एक दोन धाडी घालून वर्तमानपत्रात फोटो छापून आणण्यात पोलीस खाते-सीमा शुल्क खाते धन्यता मानते. मटका व्यवसाय वर्षानुवर्षे सुरु आहे. त्यातून असंख्य संसार लयाला गेले. ह्यासंदर्भात नारायण राणे नक्कीच पुढाकार घेतील आणि कोकणाला सुजलाम सुफलाम करतील; अशी आम्हाला खात्री आहे. कारण नारायण राणेंकडे ते सामर्थ्य आहे!

-नरेंद्र हडकर

हेही वाचा! -केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब लक्ष देतील काय?
`राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदार कंपनीचा उन्मत्तपणा’ याचे जीवंत उदाहरण म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेले महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम!

You cannot copy content of this page