आमदार नितेश राणे अभिनंदन! अधिकाऱ्यावर वचक ठेवायलाच हवा!

एका दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयात किती खेपा माराव्या लागतील? हे सांगता येत नाही. किती आर्थिक- मानसिक त्रास सहन करावा लागेल? हे माहीत नाही. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी पालकांना अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः नतमस्तक व्हावे लागते आणि दाखले मिळवावे लागतात. अतिशय फालतू कारणं सांगून तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी वर्ग दाखला घेणाऱ्याला अगदी जेरीस आणतात. सर्वसामान्य जनता या कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना वठणीवर आणू शकते; पण कायद्याला मानणारी शांतता प्रिय जनता मुकाट्याने सर्व त्रास सहन करत असते. यासंदर्भात तक्रार कोणाकडे करावी? वरिष्ठांकडे तक्रार केल्यास आपला दाखला लवकर मिळणार नाही; याची त्यांना खात्री असते. हे वर्षानुवर्षे चालत आहे. आजपर्यंत कोणत्याही आमदार-खासदाराने हा प्रश्न हाती घेतला नव्हता. कुठल्याही जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांने ह्या प्रश्नाकडे लक्ष दिला नव्हता.

परंतु कणकवली देवगड विधानसभेचे तरुण तडफदार आमदार नितेश राणे यांनी कणकवली तहसीलदार कार्यालयात जाऊन दाखला देण्याची पद्धत समजून घेतली. त्यांच्यासमोर फक्त दोन तासात ६३ दाखले तयार करण्यात आले. प्रशासनाचा कामचुकारपणा आणि सामान्य जनतेसमोरील करण्यात येणारा मस्तवालपणा उघड झाला. अधिकाऱ्यांनी आमदार साहेबांसमोरही अनेक समस्या मांडल्या; पण त्या किती तकलादू होत्या ते आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केल्या. विद्युत प्रवाह खंडित होणे, इंटरनेटचा वेग कमी असणे, अपुरा कर्मचारीवर्ग असणे वगैरे प्रश्नांची उत्तरे अभ्यासू आमदार नितेश राणे यांच्याकडे होती. त्यामुळे अधिकारी उघडे पडले आणि दाखले वेगाने तयार झाले.

आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी पालक अनेक दाखले घेण्यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी कार्यालयात जातात. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक दाखले मिळवावे लागतात. पण या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वर्ग अक्षरश: जनतेची पिळवणूक करत असतात. काही प्रश्न विचारल्यास- काही शंका विचारल्यास मनाला वाटेल ती कारणे देऊन समोरच्याला निरुत्तर केले जाते. हे थांबण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी घेतलेला पवित्रा खरोखरच अभिमानास्पद आहे. अशाप्रकारे अधिकाऱ्यांवर वचक ठेवल्यास जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास संपुष्टात येईल. अधिकारी वर्ग मनमानी करणार नाहीत.

जिल्ह्यामध्ये जमीन खरेदी विक्रीचे मोठे मोठे व्यवहार होत असतात. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात अर्थपूर्ण तडजोडी आकारास येत असतात. त्यामुळे दाखले देण्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष होत आहे. तहसीलदार कार्यालयात येणारी सर्व जनता काही श्रीमंत नाही, प्रत्येकाची राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची ओळख नाही; मग त्याचं काम होणार कसं? तहसीलदार, दुय्यम निबंधक आणि प्रांताधिकारी कार्यालयात जनतेची कामे होत नाहीत; हा काही आजचा प्रकार नाही. अनेक वर्ष हे चालू आहे. पण त्यांना जाब विचारणारा कोणी भेटला नव्हता. या परिस्थितीची जाणीव आमदार नितेश राणे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वीच करून दिली असती तर कणकवली तालुक्‍यातील जनतेचा त्रास कमी झाला. आमदार नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्यासंदर्भात अवश्य मार्गदर्शन करावे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून क्रियाशील असलं पाहिजे. प्रत्येकवेळी आपला आमदार तिथे येईल आणि जनतेचे प्रश्न सोडवेल, अशी वाट कार्यकर्त्यांनी का पाहावी?

आमदार नितेश राणे यांनी कणकवली आणि देवगड तालुक्यात `दाखला मित्र’ ही संकल्पना मांडली आणि प्रत्यक्षात आणली. आदर्श आमदाराचं हे प्रतीक आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांनी, पालकमंत्र्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे.

आमदार नितेश राणे यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेबद्दल दाखविलेला कळवळा खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!

-नरेंद्र हडकर

प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!

You cannot copy content of this page