महाराष्ट्राला एकूण १४ पद्म पुरस्कार जाहीर!
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण; ११ मान्यवरांना पद्मश्री जाहीर
नवी दिल्ली:- देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर ११ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गजल गायक पंकज उधास आणि चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
११ मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर
कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले आहेत. यात सुलेखनकार अच्युत पालव, मराठी चित्रपसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे, पार्श्व गायिका जस्पिंदर नरुला, ज्येष्ठ बासरी वादक रानेद्र भानू मजुमदार, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आहेत.
व्यापार व उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटविणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार यांना सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारोती चीतमपल्ली यांना, तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.
या वर्षी एकूण १३९ पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यात २३ महिला तर १० हे परदेशी नागरिक आहेत. १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.