अमेरिकेची तैवानला युद्धाच्या सज्जतेसाठी 345 दशलक्ष डॉलरची मदत! चीनला चपराक!
वॉशिंग्टन:- शुक्रवारी अमेरिकन काँग्रेसने व्हाईट हाऊसमधून तैवान देशाच्या सुरक्षेसाठी 345 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत घोषित केली. या घोषणेनुसार तैवान देशास संरक्षण, प्रशिक्षण व शिक्षणाकरीता साहाय्य लाभेल. अमेरिकेकडून तैवानला प्रभावी हवाई सुरक्षा प्रणाली, गुप्तचर आणि शत्रूंच्या हालचालींवर पाळत ठेवणारी यंत्रणा, आधुनिक बंदुका, क्षेपणास्त्रे मिळण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली. अमेरिकेने तैवानला केलेली ही मदत युद्धाच्या सज्जतेसाठी असल्याचा आरोप चीन करीत असून चीनने ह्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तैवानच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने `तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या दृढ वचनबद्धतेबद्दल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात कौतुक केले आहे. तसेच अध्यक्षीय कार्यालयाचे प्रवक्ते लिन यू-चॅन यांनी तैवानच्या सुरक्षेबाबत दिलेले वचन पूर्ण केल्यामुळे अमेरिकेबद्दल तैवानची कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की ही मदत द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि तैवान सामुद्रधुनीत शांतता व स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी कार्य करेल. .