आंगणेवाडी जत्रा- पार्किंगची गैरसोय आणि खराब रस्त्यांमुळे भाविकांना त्रास!

मालवण (प्रतिनिधी):- आज सुप्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा होत असताना प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाचे केलेले नियोजन प्रवासी व खाजगी वाहनातून आलेल्या भक्तांसाठी अतिशय त्रासदायक होते. कारण ह्या गाड्यांना सुमारे दीड-दोन किलोमीटर अंतरावर सक्तीने थांबविण्यात येत होते. त्यामुळे वृद्ध, महिला, बालक असलेल्या भाविकांना पायपीट करून जाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या- कार्यकर्त्यांच्या, शासनाच्या, पत्रकारांच्या गाड्यांना मात्र सोडण्यात येत होते. हा विरोधाभास निर्माण करून प्रशासनाने काय साध्य केले? असा सवाल अनेक भाविक विचारात आहेत. त्याचप्रमाणे बेळणे पूल ते विरण दरम्यान रस्त्याची दुरुस्ती अपूर्णावस्थेत ठेवल्याने त्याचाही त्रास भाविकांना झाला.

कोरोना महामारीमुळे गतवर्षीचा अपवाद वगळता दरवर्षी मालवण एसटी स्टॅन्ड आणि कणकवली स्टॅन्ड पर्यंत खाजगी वाहनांना व प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन चाकी- चार चाकी वाहनांना सोडण्यात येत होते. परंतु ह्यावर्षी खाजगी वाहनांना व प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन चाकी- चार चाकी वाहनांना मालवण एसटी स्टॅन्ड आणि कणकवली स्टॅन्ड पर्यंत सोडण्यात आले नाही. त्यामुळे हजारो भाविकांना दीड-दोन किलोमीटरची पाययपिट करावी लागली. त्याचा वृद्ध, महिला, अपंग आणि लहान मुलांना त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे गल्लीपासून-दिल्लीपर्यंतच्या राजकीय पुढाऱ्यांच्या, शासनाच्या अधिकाऱ्यांच्या, पत्रकारांच्या गाड्या थेट आतमध्ये सोडल्या जात होत्या. हा दुजाभाव करून प्रशासनाने काय साध्य केले? हा प्रश्न भाविक विचारात आहेत.

बेळणे पूल ते विरण दरम्यानचे अंतर फक्त पाच किलोमीटर आहे. गेली दोन वर्षे ह्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. आंगणेवाडी जत्रेची तारीख दोन महिने अगोदरच जाहीर झाली होती; असे असताना शेवटच्या आठ दहा दिवसात संबंधित खात्याने रस्त्याची डागडूजी करायला घेतली. पण ते काम अर्धवट सोडून दिले. त्यामुळे प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आला.

कोकणात आंगणेवाडी जत्रा ही सुप्रसिद्ध असून लाखो भाविक जत्रेच्या निमित्ताने येत असतात. परंतु प्रशासनाच्या गलथानपणामुळे झालेल्या त्रासामुळे ह्यावर्षी अनेक भाविकांनी आमच्या प्रतिनिधीकडे नाराजी व्यक्त केली.