सावधान- डुप्लिकेट ‘देवगड हापूस आंबा’

परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून विकला जातोय…

सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात!

कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबा म्हणून वितरीत होतो?

ग्राहकांची फसवणूक आणि प्रशासनाचे दुर्लक्ष!

कणकवली (विशेष प्रतिनिधी):- परराज्यातील आंबे आणून सिंधुदुर्गात ‘देवगड हापूस आंबा’ म्हणून विकला जातोय. ही खरेदीदारांची (गिऱ्हाईकांची) चक्क फसवणूक आहे. ह्या गैरप्रकारामुळे सिंधुदुर्गातील हापूस आंबा बागायतदार- शेतकरी यांना खराखुरा हापूस आंबा कवडीमोल भावाने विकावा लागतोय. ह्या गैरप्रकारामुळे सिंधुदुर्गातील हापूस आंबा बागायतदार – शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. याबाबत स्थानिक राजकीय पुढारी ‘अर्थपूर्ण’ तडजोड (?) करून या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करतात का? आंबा बागायतदार- शेतकरी संघटितपणे याविरुद्ध लढा का देत नाहीत? असे गंभीर प्रश्न उभे राहतात.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फेब्रुवारी ते मे ह्या चार महिन्यात हापूस आंब्याचा जोरदार हंगाम असतो आणि दरही चांगला मिळतो. याचाच फायदा घेत कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात आंबा आणला जातो आणि तो देवगड हापूस आंबा म्हणून कमी किमतीत विकला जातो. त्यामुळे सिंधुदुर्गातील हापूस आंबा कमी दराने विकण्याशिवाय आंबा बागायतदार-शेतकरी यांच्याकडे पर्याय नसतो. ह्या गैरप्रकारामुळे सिंधुदुर्गातील आंबा बागायतदार आर्थिक तोट्याला सामोरा जातो.

आमच्या प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक-दोन दिवसाआड परराज्यातून हजारो डझन आंबे मोठ्या ट्रकातून आणून उतरविले जातात. ‘देवगड हापूस आंबा’ लिहिलेल्या एक-एक डझन पेटीत हे आंबे असतात. नंतर ह्या आंब्याच्या पेट्या जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावर तसेच अन्य प्रमुख मार्गावरील रस्त्यावर विकले जातात. विकणारी माणसेही परराज्यातील असतात. डुप्लिकेट देवगड हापूस आंबे कमी दरात मिळत असल्याने गिऱ्हाईक ते आंबे घेतात. अशाप्रकारे गिऱ्हाईकांची घोर फसवणूक करण्यात येते. त्याचा दुष्परिणाम असा होतो की, सिंधुदुर्गातील हापूस आंबा कमी दरात विकावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागातदार-शेतकऱ्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होत असते.

सिंधुदुर्गात गोव्यातून चोरटी वाहतूक करून दारू आणून, ती अवैधरित्या विकली जाते. त्यामुळे राज्याचा कोट्यावधीचा महसूल बुडतो. त्याचप्रमाणे परराज्यातील आंबे आणून ते ‘देवगड हापूस आंबा’ म्हणून विकले जातात; यातून जिल्हावासीय शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान व ग्राहकांची फसवणूक होते. हे थांबविणे येथील स्थानिक राजकीय नेत्यांना सहजशक्य आहे; पण त्यांचेही ‘अर्थपूर्ण’ (?) संबंध असल्याचा संशय असल्याचा अनेकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. त्याचप्रमाणे आंबा बागायतदारांनी ह्या गंभीर गैरप्रकाराबाबत एकजूट दाखविणे गरजेचे आहे! परराज्यातील आंबे सिंधुदुर्ग देवगड हापूस आंबे म्हणून विकताना प्रशासनही कोणतीही कारवाई का करत नाही? हा प्रश्न निर्माण होतो.

कीटकनाशके-खते यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कामगारांची मजुरी सुद्धा वाढलेली आहे. त्यात नैसर्गिक आपत्ती आहेच. ह्या सर्व कारणांनी आंबा बागातदार शेतकरी नेहमीच आर्थिक संकटात सापडतो. त्यामध्ये अशाप्रकारे परराज्यातील आंबे देवगड हापूस आंबे म्हणून विकणाऱ्या टोळीने घातलेला हैदोस जिल्हा बागातदारांना आर्थिक संकटात टाकणार आहे. याची दखल सिंधुदुर्गवासियांनी घेणे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page