परिवर्तन दिनानिमित्त सिंपन प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा

बाळकृष्ण जाधव यांची माहिती- आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली (भगवान लोके):- सिंपन प्रतिष्ठान मुंबई या संस्थेच्यावतीने मंगळवार १४ मे रोजी सकाळी १०.३० वा. मराठा मंडळ नाट्यगृहात परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला. हा सोहळा सिंपन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सिंपन प्रतिष्ठानचे सरचिटणीस बाळकृष्ण जाधव यांनी दिली.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. जाधव बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल तांबे, कार्याध्यक्ष डॉ. संदीप कदम, खजिनदार दत्ता पवार, सुनील जाधव, सर्वेश पवार उपस्थित होते. तसेच या सोहळयाला जानवलीचे सरपंच अजित पवार, वास्तूविशारद प्रथमेश पडवळ, ख्यातनाम चित्रकार नामानंद मोडक आदी मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत.

सदर कार्यक्रमात प्रा. रमाकांत जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सिंपन जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी यांना प्रदान केला जाईल. प्रा. विजय जामसंडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा सिंपन विजयी भव युवा पुरस्कार समाजसेवक ॲड. सिद्धार्थ इंगळे यांना प्रदान केला जाईल. याशिवाय सिंपन अमृत सन्मान पुरस्कार बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी अनंत तांबे, ज्येष्ठ समाजसेवक र. शा. पेडणेकर, ओएनजीसीचे सहाय्यक अभियंता व माजी सैनिक व्ही. टी. जंगम, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सूर्यकांत राणे, ज्येष्ठ समाजसेवक जनार्दन जाधव यांना (मरणोत्तर) या सर्वांना प्रदान केला जाणार आहे. याशिवाय एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या समीर कदम यांचा प्रतिष्ठानतर्फे विशेष सन्मान केला जाणार आहे.

१४ मे १९३८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कणकवलीत आगमन झाले होते. यानिमित्त यादिवशी डॉ. आंबेडकर यांच्या परिवर्तन विचारांना उजाळा देण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी सिंपन प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी १४ मे हा दिवस परिवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. आंबेडकर यांचे ज्या-ज्या ठिकाणी पदस्पर्श झाला, त्या-त्या ठिकाणी त्यांची स्मारके बांधण्यात आली आहेत. मात्र, कणकवलीत त्यांचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. हे स्मारक उभारण्यासाठी सिंपन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या जानवली गावात स्मारक उभारण्यासाठी जागा घेतली असून लवकरच स्मारक उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून बहुजनसमाजाच्या हितासाठी विविध उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविले जाणार आहेत, असे जाधव यांनी सांगतानाच परिवर्तन दिन अभिवादन व सिंपन पुरस्कार प्रदान सोहळा सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सुद्धा केले. यावेळी प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणार्‍या उपक्रम व कार्याची माहिती डॉ. संदीप कदम यांनी दिली.