गढीताम्हाणे : मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

सिंधुदुर्गनगरी:- गढीताम्हाणे-मधलीवाडी येथील मारहाणप्रकरणी विकास चंद्रकांत कदम (५४) व आदित्य विकास कदम (२२) या संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी मंजूर केला आहे. संशयितांच्यावतीने ॲड. मिलिंद नकाशे, ॲड. विठोबा मसुरकर व ॲड. अनंत नकाशे यांनी काम पाहिले.

गढीतम्हाणे मधलीवाडी येथील यशवंत विश्वास कदम यांना तेथील संशयित आदित्य कदम याने दांड्याने मारहाण केली होती. तर संशयित विकास कदम याने शिवीगाळ केली होती. कराराने दिलेल्या बागेत कुंपन करण्याच्या वादावरून ही घटना २२ मार्च रोजी रात्री ११.३० वा. च्या सुमारास घडली होती. याबाबतची तक्रार फिर्यादी यशवंत कदम यांनी देवगड पोलीस ठाणे येथे ११ एप्रिल रोजी दाखल केली होती. त्यानुसार दोन्ही संशयितांविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ व कलम ३२६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये संशयितांनी अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता. याकामी अॅड. मिलिंद नकाशे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने संशयितांचा अटकपूर्व जामिन अर्ज मंजूर केला आहे.