भाजपाचा जाहीरनामा `मोदींची गॅरंटी’ – अनेक आश्वासनांची यादी

नवीदिल्ली- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे निमित्त साधत भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या २०२४ च्या निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून सदर जाहीरनाम्याला `मोदींची गॅरंटी’ असे नामकरण करण्यात आले आहे. निवडणूक जाहीरनाम्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. पंधरा लाखांपेक्षा जास्त सूचना आल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यावेळी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित आहेत. जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

१) गरिबांसाठी २०२९ पर्यंत मोफत रेशन योजना देण्याचे वचन.
२) आयुष्मान योजनेंतर्गत ७० वर्षांवरील वृद्धांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे वचन.
३) मुद्रा योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा २० लाख रुपये असेल.
४) गरिबांना ३ कोटी घरे दिली जातील.
५) एक राष्ट्र, एक निवडणूक आणि समान मतदार यादी प्रणाली सुरू केली जाईल.
६) आणखी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार.
७) तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळेल.
८) घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहचवणार.
९) ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.
१०) महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार.
११) कोट्यवधी लोकांची वीजबिल शून्य करणार.
१२) पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.
१३) 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु.
१४) गेल्या १० वर्षात भाजप सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई केली. कठोर कारवाई सातत्याने केली जाईल.
१५) जागतिक बांधव म्हणून मानवतेसाठी प्रयत्नशील राहू.
१६) नारी शक्ती वंदन कायदा केला, कलम ३७० हटवले आणि CAA आणले. त्याचप्रमाणे सुधारणा, कार्यप्रदर्शन आणि परिवर्तन या मंत्रावर वेगाने पुढे जाऊ.
१७) सुशासन, डिजिटल गव्हर्नन्स आणि डेटा गव्हर्नन्ससाठी देशात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
१८) एक राष्ट्र आणि एक निवडणूक असा संकल्प असेल.
१९) देशाच्या हितासाठी समान नागरी संहिता आवश्यक असल्याने त्यावर कार्य केले जाईल.
२०) अंतराळ विज्ञानात लक्ष केंद्रित करू त्यामुळे भारतातील तरुणांना प्रचंड संध्या उपलब्ध होतील.
२१) जगात युद्धांमुळे तणाव असल्याने तणावग्रस्त भागात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊ.
२२) देशाला आर्थिक समृद्धी देऊन विकसित भारत करू.
२३) जगातील प्रत्येक उदयोन्मुख क्षेत्रासाठी भारताला जागतिक केंद्र बनवण्याचा संकल्प.
२४) भारतात हरित ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोबाईल, सेमी-कंडक्टर, कॉन्ट्रॅक्टिंग आणि कमर्शिअल हब तयार करण्यात येईल.
२५) जगातील सर्वात मोठी आर्थिक केंद्रे भारतात असतील. भारत ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स, ग्लोबल टेक्नॉलॉजी सेंटर आणि ग्लोबल इंजिनिअरिंग सेक्टरचे केंद्र बनेल.
२६) देशभरात चार्जिंग स्टेशन आणि पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत आणि आणखी वाढविल्या जातील. त्यामुळे देशात रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.
२७) राष्ट्रीय सहकार धोरण आणले जाईल.
२८) देशभरात दुग्ध सहकारी संस्थांची संख्या वाढवण्यात येणार.
२९) जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली असून भारताला जागतिक पोषण केंद्र बनविणार. त्याचा लाभ २ कोटींहून अधिक छोट्या शेतकऱ्यांना होणार.
३०) कडधान्य आणि तेलबियांमध्ये शेतकऱ्यांना मदत करणार. भाजीपाला उत्पादन आणि साठवणुकीसाठी नवीन क्लस्टर तयार करणार.
३१) मत्स्यपालनासाठी नवीन उत्पादन आणि प्रक्रिया क्लस्टर तयार केले जातील. सीव्हीड लागवड आणि मोती लागवडीसाठीही प्रोत्साहन दिले जाईल.
३२) महिला खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्यासाठी विशेष कार्यक्रम आणि विशेष सुविधा निर्माण केल्या जातील. भगिनी-मुलींच्या आरोग्याचे ध्येय पुढे नेत गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.
३३) नमो ड्रोन दीदी योजनेचा विस्तार केला जाईल. प्रत्येक गावातील बहिणी ड्रोन पायलट बनतील. कृषी क्रांतीमध्ये ड्रोन दीदींचीही स्थापना होणार आहे.
३४) स्वनिधी योजनेचा विस्तार केला जाईल.
३५) गरिबांच्या जेवणाची ताट पौष्टिक असेल, त्याचे मन समाधानी असावे आणि स्वस्तही असावे. पोट भरलेले, मन भरलेले आणि खिसाही भरलेला असेल; ह्यावर कार्य केले जाईल.
३६) देशातील तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी ह्या चार मजबूत स्तंभांना सामर्थ्य दिले जाईल.