संपादकीय- समर्थ नेत्यालाच उमेदवारी!

येत्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चितच झाली होती; कारण ते मागील १० वर्षांपासून खासदार आहेत तसेच महाविकास विकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपली ताकद पाहून ह्या जागेवर आपला हक्क दाखवू शकले नाहीत. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी मिळणे सहज शक्य झाले.

पण नारायण राणे यांच्या बाबतीत असे झाले नाही. कारण ही जागा शिवसेनेची. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेने त्यावर दावा सांगणं साहजिकच होतं. त्याचप्रमाणे ठाणे, नाशिक वगैरे जागांवर युतीमध्ये ताणतणाव आहेत. तसेच महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर एकमत नाही. त्यामुळे भाजपामध्ये नारायण राणे यांचे मोल कमी झाले असे म्हणता येणार नाही. नारायण राणे शिवसेनेत होते तेव्हा त्यांनी शिवसेना विरोधी पक्षांच्या विरोधात व काँग्रेसमध्ये असताना काँग्रेस विरोधी पक्षांच्या विरोधात जी भूमिका घेतली ती आक्रमक आणि उतुंग राजकारणी व्यक्तीला साजेशी असणारी होती. काँग्रेसमध्ये असताना भाजपाला विधिमंडळात व बाहेरही कित्येकवेळा उघडं पाडलं होतं. आज ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाविरोधी भूमिका घेतात. त्यामुळे नारायण राणे यांचे राजकीय विरोधक जास्त आहेत. तरीही त्यांच्याकडे राजकीय सामर्थ्य आहे; हे त्यांच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांनी मान्य करायलाच पाहिजे. ज्याअर्थी नारायण राणे यांना भाजपाला उमेदवारी जाहीर करावी लागली व त्यापूर्वी केंद्रात महत्वाचे मंत्रीपद द्यावे लागले; ह्याचा अर्थ नारायण राणे यांचा भाजपाने योग्य तो सन्मान केलाच आहे. माजी खासदार निलेश राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपाने उमेदवारी दिली असती तर नारायण राणे यांना आणखी समाधान झाले असते. पण राजकीय समीकरणामध्ये वैयक्तिक समाधानापेक्षा पक्षाच्या यशासाठी कार्यरत राहणे; ह्याचे भान नारायण राणे यांच्याकडे नक्कीच आहे.

नारायण राणे यांनी विजय आणि पराजय दोन्हीही बघितले आहेत. राजकारणात जय पराजयाच्या गोष्टी होतच असतात. पण राजकीय नेत्याने आपल्या वर्तमानातील पक्षाला जिंकून देण्यासाठी सर्वस्वी अर्पण करण्याची तयारी ठेवली पाहिजे; ती तयारी नारायण राणे यांच्याकडे नेहमीच असते; म्हणूनच गेल्या ३० – ३५ वर्षात त्यांचा राजकीय दबदबा कमी झालेला नाही. राजकारणात ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या त्यांनीही केल्या. नारायण राणे यांनी राजकारणात ज्या गोष्टी केल्या त्या इतर राजकीय नेत्यांनी कधी केल्याच नाहीत, असे नाही. राजकीय नेत्याला आधी स्वतःचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी अभिमन्यूप्रमाणे एकाकी लढावेच लागते. (त्यातून कोणत्याही राजकीय नेत्याची सुटका नसते.) नव्हे लढून जिंकतो तोच राजकारणात टिकतो, यशस्वी होतो. हे लक्षात घेतल्यावर नारायण राणे यांचे राजकारणातील महत्व अधोरेखित होते.

नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप पडली. त्यांना राज्यसभेत खासदारकी व केंद्रात मंत्रीपद मिळाले. नारायण राणे ह्या निवडणुकीत विजयी झाले आणि केंद्रात भाजपाची सत्ता आली तर त्यांना मंत्रीपद निश्चित मिळू शकते. कारण भाजपाकडे कोकणात आपली राजकीय ताकद अबाधित ठेवण्यासाठी नारायण राणे यांच्यासारखे दुसरे नेतृत्व नाही. त्यामुळे अनेक भाजपा नेत्यांची नावे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघासाठी चर्चेत आली आणि चर्चेतच राहिली. हे समजून घेण्याची गरज आहे. नारायण राणे यांना विजयी करायचे की नाही? हे मतदार ठरवतील; कोणताही राजकीय पक्ष नाही; कारण राजकारणात नारायण राणे अजूनही समर्थ नेते आहेत.