कासारवडवली-गायमुख मेट्रोच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई:- मुंबई मेट्रो मार्ग-४ चा विस्तार असणाऱ्या कासारवडवली ते गायमुख (४ अ) या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्य केलेल्या मेट्रो बृहत्‌ आराखड्यातील मेट्रो मार्ग ४ वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या प्रकल्पास राज्य शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. मात्र, ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुतर्फा होणारे नागरीकरण आणि या भागात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा परिसरही मेट्रो सेवेने जोडण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. त्यानुसार दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने तयार केलेला मेट्रो मार्ग ४ अ कासारवडवली-गायमुख (मेट्रो मार्ग ४ चा विस्तार) हा सुधारित प्रकल्प अहवाल एमएमआरडीएने सादर केला. त्यास आज मंजुरी देण्यात आली आहे.

मेट्रो मार्ग ४ अ साठी जून २०१७ च्या भावपातळीनुसार ९४९ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्द‍िष्ट असून त्यासाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना नियुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सुरुवातीला प्रकल्पाचे स्थापत्य बांधकाम करण्यासाठी लागणारा ४४९ कोटी ८ लाख रुपयांचा खर्च प्राधिकरणाच्या निधीतून करणे; प्रकल्पासाठी केंद्रीय कर, राज्य शासनाचा कर व जमिनीची किंमत मिळून १५७ कोटी ७७ लाखांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज देणे; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाने स्वत:चा निधी वापरणे; न्यू डेव्हलपमेंट बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) इत्यादी आंतरराष्ट्रीय किंवा आंतरदेशीय वित्तीय संस्थांमार्फत कर्ज सहाय्य घेणे; शासकीय किंवा निमशासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून कायमस्वरुपी आवश्यक असलेल्या जमिनी तसेच बांधकामादरम्यान तात्पुरत्या वापरासाठी आवश्यक असलेल्या मोकळ्या जागा नाममात्र दराने एमएमआरडीएला हस्तांतरित करणे यासारख्या बाबींनाही मान्यता देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *