“हेल्थ इज वेल्थ” या उक्तीप्रमाणे जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची
नवी मुंबई : “हेल्थ इज वेल्थ” या उक्तीप्रमाणे जीवनात शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असून त्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांनी केले.
संचालनालय, लेखा व कोषागारे आणि संचालनालय स्थानिक निधी लेखा परीक्षा कर्मचारी कल्याण समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०१८ चा समारोप व बक्षिस वितरण समारंभ स्व.राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर-४, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई येथे झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार २०१६ चे विजेते सुर्यकांत ठाकूर, अध्यक्ष (DATSWA) महाराष्ट्र राज्य तथा संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई ज.र.मेनन, एमएमआरडीएचे संचालक माधव नागरगोजे, सहसंचालक लेखा व कोषागार कोकण विभाग सिताराम काळे यावेळी उपस्थित होते.
डॉ.रामास्वामी एन.म्हणाले की, अशा स्पर्धांमुळे विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी एकत्र येतात व त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत त्यांनी लेखा व कोषागारे विभागाचे अभिनंदन केले व विजेत्या विभागास शुभेच्छा दिल्या.
श्री.काळे आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, या राज्यस्तरीय स्पर्धांना २००५ सालापासून सुरुवात झाली असून या स्पर्धेस संपूर्ण राज्यातील विविध शासकीय कार्यालये, महामंडळ, प्राधिकरण, जिल्हा परिषदांमधून २ हजार पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. या स्पर्धेकरीता १ हजार ५०० अधिकारी/कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था नवी मुंबई येथे विविध १३ ठिकाणी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी स्पर्धेकरीता क्रीडा संकुल, नाट्यगृह, परिवहन बसेस इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे विशेष आभार मानले. तसेच या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य लाभलेल्या सर्व संबंधितांचे श्री.काळे यांनी आभार मानले.
संचलन, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा अशी संपूर्ण स्पर्धा एकूण २२५ गुणांची होती. गुणांनुसार प्रथम, द्वितीय, तृतीय मानांकनाचे मानकरी ठरले. २२५ पैकी १२५ इतके सर्वोत्तम गुण मिळवून अधिदान व लेखा कार्यालय विभागाने स्पर्धेचा सर्वसाधाण विजेतेपदाचा चषक पटकावला. गत स्पर्धेतील तथा यजमान कोकण विभागाने ९४ गुण मिळवून स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले.
या क्रीडा स्पर्धेचा क्रीडाध्वज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन. यांच्या हस्ते उतरवून कोकण विभागाकडील क्रीडाध्वज अमरावती विभागास सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रगीताने या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. पुढील राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे यजमानपद अमरावती विभागास देण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवी मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री.महेंद्र कोंडे यांनी केले.