सावधान- अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे वेताळबांबर्डे तेलीवाडी दुर्घटना होण्याची शक्यता!
सिंधुदुर्ग (रणजित देसाई ):- महामार्ग चौपदरीकरणासाठी आवश्यक असलेल्या मातीचा भराव करण्यासाठी वेताळबांबर्डे तेलीवाडी येथील जैवविविधतेने नटलेला डोंगर उभाच्या उभा कापून माती काढण्यात आली. आज या बाजूने जाताना असं जाणवलं की मुसळधार पावसात हा संपूर्ण च्या संपूर्ण डोंगर कोसळून रस्त्यावर येणार व त्यामध्ये लगतची सर्व घरे तसेच रस्त्यावरील वाहने सुद्धा गाडली जातील. ही माती काढण्याकरता व झाडे तोडण्यात करता परवानगी देणारे वनविभागाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु सदर माती काढणारे दिलीप बिल्डकॉन कंपनीचे अधिकारी यांच्यावर देखील कारवाई होणे गरजेचे आहे. काही वर्षापूर्वी माळीण गावामध्ये अशाच प्रकारची दुर्घटना घडून अख्खाच्या अख्खा डोंगर कोसळून संपूर्ण गाव नेस्तनाबूत झालेलं होतं. अनेक लोकांना आपला जीवदेखील गमवावा लागला होता. याची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता संबंधितांवर कारवाई तर झालीच पाहिजे. परंतु सदर माती रस्त्यावर किंवा लगेच या घरांमध्ये घुसू नये याकरता योग्य ते उपाय योजना देखील झाली पाहिजे. अद्यापपर्यंत केवळ पाच टक्के पाऊस पडला तरी या भागात अनेक ठिकाणी माती रस्त्यावर यायला सुरू झालेली आहे. मुसळधार पाऊस पडला तर काय परिस्थिती निर्माण होईल याचा विचार न करणेच बरे. सोबत सदर जागेचा व कापलेला डोंगराचा व्हिडिओ शेअर करत आहे.