ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई:- ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने अतिशय तरल आणि भावस्पर्शी संगीत देणारा महान कलावंत आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, खय्याम यांच्या अभिजात रचनांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अजरामर ठरलेल्या अनेक रचनांमुळे खय्याम रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. उमरावजान, कभी कभी, आखरी खत, रझिया सुलतान, नुरी अशा चित्रपटातील त्यांची काही गीते कालातीत आहेत. मिर्झा गालिब, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, निदा फाजली अशा श्रेष्ठ प्रतिभावंतांच्या महान रचनांना खय्याम यांनी पुरेपूर न्याय दिला. एक कलावंत म्हणून खय्याम जेवढे महान होते तितकेच ते एक माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. पद्मभूषण, फिल्मफेअर अशा अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांचा सार्थ गौरव झाला होता. अलिकडेच हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांचे प्रशंसापर आशीर्वाद लाभले होते. ही भेट अखेरची ठरल्याचे मला मनस्वी दुःख आहे.