आम्हाला किती दिवस गृहीत धरणार? युवतींचा स्त्रियांच्या प्रश्नावर तीव्र प्रतिक्रिया

गोपुरी आश्रम वाचन संस्कृती उपक्रमात युवतींनी स्त्रियांच्या प्रश्नावर व्यक्त केल्या तीव्र प्रतिक्रिया

कणकवली:- आपल्या देशाचा इतिहास पाहिला तर सातत्याने महिलांना प्रत्येक गोष्टीत गृहित धरून कौटुंबिक पातळीवर बऱ्याच वेळा सामाजिक पातळीवर निर्णय घेतले जातात. स्रीला गौण स्थान दिले जाते. आज स्त्रियांनी सर्वच क्षेत्रात स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले आहे. त्यामुळे समाजाने प्रत्येक निर्णय प्रकियेत महिलांना सहभागी करून घेण्याची मानसिकता विकसित करावी; असे परखड मत गोपुरी आश्रमाच्या वाचन संस्कृती विकास कार्यक्रमात बोलताना युवतींनी मांडले.

`मिळून साऱ्याजणी’ मासिकातील राधिका टिपरे यांच्या “आंम्हाला किती दिवस गृहीत धरणार?” या लेखाचे विवेचन करताना सोनल भिसे या युवतीने या लेखात मांडलेल्या इतिहासाच्या संदर्भाचा आढावा घेत आपले परखड मत व्यक्त केले.

गोपुरी आश्रमात झालेल्या वाचन संस्कृती विकास कार्यक्रमात.अंकिता सामंत हिने साखरा रेवंडकर यांच्या मालवणी माणसाच्या अतरंगीपणाचे वर्णन करणाऱ्या ‘अतरंगी’ या पुस्तकाचे विवेचन केले. पुजा विश्वकर्मा हिने मिळून साऱ्याजणी मासिकातील नवा जन्म या स्पायनल स्कॉड झालेल्या महिलेने या असाध्य आजारांवर केलेली यशस्वी मात, असाध्य आजारात जगण्याची दिलेली उमेद प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे; असे सांगितले.

पल्लवी कोकणी हिने साधना साप्ताहिकाच्या दिवाळी अंकातील अनिल अवचट यांच्या ‘ माझ्या जगण्याचा मार्ग बदलणारा बिहार’ या लेखाचे विवेचन करताना अनिल अवचट यांचा बिहारच्या १९६६ सालच्या दुष्काळाच्या अनुभवामुळे त्यांनी आपले आयुष्य लोकांसाठीच जगण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतरच्या त्यांच्या जीवनाच्या वाटचलीवर प्रकाश टाकला.

प्रियांका पेडणेकर हिने अण्णाभाऊ साठे यांच्या ‘चित्रा’ या कादंबरीचे विवेचन केले. प्रणाली नार्वेकर हिने हमिद दलवाई यांचा ‘ईंधन’ ह्या कादंबरीची माहिती सांगितली.

सिद्धी वरवडेकर हिने श्रीनिवास जोशी यांच्या ‘आनंदी गोपाळ’ या पुस्तकाचे विवेचन करताना पहिल्या महिला डॉक्टर म्हणून त्यांची कारकीर्द सांगितली. या पुस्तकावर चर्चा करताना डॉ.रश्मि पेडूरकर म्हणाल्या की, आनंदी बाईंच्याच काळात डॉ.रखमाबाई राऊत ह्यासुद्धा महिला डॉक्टर म्हणून नावारूपाला आलेल्या होत्या.त्यांनी बडोदा येथे हॉस्पिटल सूरू करून अडाणी पतीसोबतचा संसार त्याग करून वयाच्या नव्वद वर्षापर्यंत समाजाला वैद्यकीय सेवा दिली. हा आदर्श ही आजच्या पिढीला समजायला हवा. परंतु डॉ.रखमाबाईंचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य समाजासमोर आले नाही; याविषयी खंत व्यक्त केली.

तेजश्री आचरेकर हिने ईंद्रा नुई या कार्पोरेट क्षेत्रातील प्रयोगशिल व ध्येय्यासक्त महिलेच्या आत्मचरित्राचे विवेचन केले.

सोनाली गुरव हिने गुरु ठाकूर यांच्या आयुष्याला द्यावे उत्तर या कवितेचे वाचन आणि विवेचन केले.

मंगल राणे यांचा सत्कार
वाचन संस्कृती विकास उपक्रमाच्या तिसऱ्या पिढीच्या अद्यक्षा मंगल राणे यांना ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेत सहायक अभिनेत्रीची भूमिका मिळाल्याबद्दल अद्यक्षा सिद्धी वरवडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मंगल राणे यांनी आपल्या जीवनाचा अतिशय खडतर प्रवास करत इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे; असे गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनी उपस्थितांना सांगितले.

मंगल राणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कणकवली कॉलेजच्या युवा महोत्सवातून माझ्या अभिनयाचा प्रवास झाला. आर्थिकतेशी झगडत प्रवास सुरू ठेवला. जीवनात चॅलेंज स्वीकारल्याशिवाय आपले अस्तित्व सिद्ध करता येत नाही; हे मला वाचन संस्कृतीने शिकविले. आयुष्यात प्रगती करण्यासाठी पैसा नसणे ही कधीच अडचण नसते. तर आपल्या अस्तित्वावर आपला विश्र्वास असावा लागतो.

यावेळी अर्पिता मुंबरकर यांनी महाराष्ट्र टाइम्स मधील श्रीरंजन आवटे यांच्या ‘अस्वस्थ वर्तमनाच्या माजघरात’ आणि संध्या नरेपवार यांच्या ‘काणात घुमनाऱ्या काश्मिरच्या स्रिया’ ह्या लेखांविषयी माहिती सांगितली.

सचिन मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजा खरात, सूत्रसंचालन शेलेश कदम व तेजश्री आचरेकर यांनी तर आभार प्रविण खैरावकर यांनी मानले. या कार्यक्रमाला ३५ युवक युवती उपस्थित होते.

गोपुरी आश्रमाच्या वाचन संस्कृती विकास कार्यक्रमात बोलताना मंगल राणे, बाजूला सिद्धी वरवडेकर,पल्लवी कौकणी, सचिन मोहिते,गोपुरी आश्रमाच्या संचालक अर्पिता मुंबरकर

You cannot copy content of this page