जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध!- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी दि.15 (जि.मा.का):- जनतेच्या कल्याणासाठी शासन अनेक योजना राबवित असते. अशा योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण श्री केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जनतेला दिलेल्या शुभेच्छापर भाषणात ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित होते.
श्री. केसरकर म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गौरवशाली इतिहास आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले. या लढ्याच्या यज्ञात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा अनेकांच्या त्यागातून, प्राणार्पणातून आपल्याला स्वराज्य मिळाले आहे. अशा या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व ज्ञात- अज्ञात वीरांना माझे त्रिवार नमन. या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण होण्यासाठी ‘माझी माती- माझा देश’ हे विशेष अभियान सुरू झालेले आहे. या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नेत्यांनी पाहिलेले सु-राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला एकजूट दाखवावी लागेल असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आपले राज्य विकासाकडे घोडदौड करत आहे याचा मला अभिमान आहे. ‘महसूल सप्ताह’ च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून नागकिकांना योजनांचा लाभ घरपोच दिला आहे. विशेष म्हणजे कातकरी समाजाला जातीचे दाखले तसेच विद्यार्थ्यांना महत्वाचे प्रमाणपत्रे त्यांच्या घरी जाऊन देण्यात आली आहेत. आपल्या जिल्ह्याचे कामकाज आता पूर्णपणे ई-ऑफिसच्या माध्यमातून असून आपला जिल्हा या प्रणालीमध्ये आघाडीवर आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. स्थानिक युवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देऊन स्थानिक स्तरावरील आपत्तीच्या प्रतिसादासाठी त्यांना सक्षम बनविणे हे याचे महत्वाचे उद्दिष्ट्य आहे. या उपक्रमांतर्गत २०० स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आलेली आहे असेही ते म्हणाले.
शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाविषयी बोलताना ते म्हणाले की, शासनाने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मातृभाषेतून दिले गेलेले शिक्षण हे अधिक परिणामकारक ठरते हे सिद्ध झालेले आहे. भारतातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात यावर भर देण्यात आला आहे. राज्यात देखील याची प्रभावी अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने काम केले जात आहे. पुस्तकांमध्येच सरावासाठी कोरी पाने दिल्याने विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी केल्याचे मोठे समाधान आहे. शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश, बूट आणि सॉक्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन डिझाईनचा गणवेश स्काऊट गाईडच्या गणवेशाशी साधर्म्य साधणारा असल्याने तो त्यासाठीही वापरता येणार आहे. शाळेत पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी ‘पहिले पाऊल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत पाच पट वाढ करण्यात येऊन आता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रूपये इतकी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नामांकित शिक्षण संस्थांसोबत करार करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र आणि सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, मॅनहटन कम्युनिटी कॉलेज बरो यांच्यादरम्यान परस्पर शैक्षणिक सहकार्यासाठी करार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान मिळावे आणि शेतीचे महत्त्व समजावे यासाठी शेती हा विषय शिकविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गायन, नाट्य, वक्तृत्व यामध्ये आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी सेलिब्रिटी स्कुलसोबत टायअप करून सेलिब्रिटी स्कूलची संकल्पना राबवली जाणार आहे. मानसिक विकासासाठी वाचन गरजेचे असते, यासाठी ‘रिड महाराष्ट्र’ उपक्रमाबरोबरच ग्रंथालयांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 500 विद्यार्थी क्षमता असलेली नेताजी सुभाषचंद्र बोस निवासी शाळा स्थापन केली जात आहे. भारतीय संस्कृतीतील आधारस्तंभाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार तसेच शिक्षण सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे. आता प्राथमिक विद्यालयातील शिक्षण सेवकांना 16 हजार, माध्यमिकसाठी 18 हजार तर उच्च माध्यमिकसाठी ते 20 हजार रूपये इतके मानधन करण्यात आले आहे. खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्या तीन वर्षांसाठी ग्रंथपालांना 14 हजार, प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार, कनिष्ठ लिपिकांना 10 हजार तर केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना आठ हजार रूपये मानधन देण्यात येणार आहे. नुकताच 61 हजार शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविण्यात आला आहे. शिक्षकांचे समायोजन, शिक्षक पदभरतीत दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करणे आदी निर्णयही घेण्यात आले आहेत. ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर आणि भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. मराठी भाषा धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. भाषेच्या प्रसार प्रचारासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शासकीय कार्यालर्यांसह ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर होतो अशा सर्व ठिकाणी हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण, संगणक इत्यादींसाठी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमालेचा, अक्षरमालेचा व अंकांचा शासनाने स्वीकार केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भाषणातील प्रमुख मुद्दे :
- खरीप हंगामामध्ये शासनाने 1 रुपयात पिक विमा योजना घोषित केल्याने प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये 29 हजार शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग
- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत 32 वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगांना अनुदान स्वरुपात अर्थ सहाय्य / कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत 784 लाभार्थ्यांना अर्थ सहाय्य
- डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत जिल्हा नियेाजन विकास समितीमार्फत 1 कोटी व राज्य शासनामार्फत 3 कोटी 56 लाख असे एकूण 4 कोटी 56 लाख रुपयांचे अनुदान खर्च
- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत विकास सोसायटी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 23 हजार सभासदांना 36 कोटी रकमेचा लाभ
- महात्मा जोतीराव फुले शेतकरी योजने अंतर्गत 9 हजार 900 शेतकऱ्यांना 41 कोटी रकमेचा लाभ
- सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक विकासकामे मंजुर / सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांना जोडणारे सोनवडे घाट रस्त्याच्या कामाकरिता सुमारे ७२३ कोटी इतका खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प आराखडा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात
- महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा जिल्ह्यातील 165 महिलांना लाभ / क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत 1 हजार 474 लाभार्थ्यांना 1 कोटी 68 लाख रुपयांचा लाभ / सखी वन स्टॉप सेंटर मार्फत अनेक संकटग्रस्त महिलांना सेवा पुरविण्यात आल्या
- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 25 हजार 400 मेट्रीक टन धान्याचे वितरण / राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीत 12 हजार 500 मेट्रीक टन धान्याचे वितरण
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव
स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले सावंतवाडी येथील स्वातंत्र्य सैनिक वसंत सिताराम केसरकर, सांगेली येथील सविता शांताराम कदम यांचे पती हे 1971 साली लढ्यात शहिद झालेले होते, त्यामुळे कृतज्ञता म्हणून यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले.
सन 2022-23 या वर्षात महसूल विभागाच्या धोरण व उदिष्ट्यांप्रमाणे ई-फेर फार, ई-पीक पाहणी, ई-चावडी, कृषी गणना या ऑनलाईन प्रणालीमध्ये उत्कृष्टपणे काम करुन शासनाची प्रतिमा उंचावण्यास हातभार लावल्याबद्दल सर्व तलाठी सुधीर साळुंखे, विश्वास शेंडी, योगेश माळी, आर.डी. चरापले, चारुशाला वितोरकर, पी.पी. शेख, अमरेश सातारकर, सचिन चितारे यांना गौरविण्यात आले आहे. तसेच पूर परिस्थिती व शोध बचाव कार्यामध्ये काम केलेले जिल्हा समादेशक होमगार्ड संतोष मातोडकर, विल्सन फर्नांडीस, शंकर घाडी, भागु पाटील, विश्वजित भटके, विनायक सावंत, शिवशंकर सावंत, शिवशंकर देसाई, शंकर नूत्री, सखाराम गवस यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिंधुदुर्ग विभाग कणकवली अंतर्गत 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी विना अपघात सेवा केलेले राजेंद्र सदाशिव दुलम, दिलीप राजाराम साटम, अजितकुमार अन्नू परमाज, रविंद्र देऊ सावंत, संतोष जनार्दन डिचवलकर, शामसुंदर सोनु मुळम, शरद गणेश कुलकर्णी या चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यात गुणवत्ताधारक ठरलेल्या जिल्ह्यातील पुढील विद्यार्थ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
- वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वि.मं. कोकिसरे-बांबरवाडी येथील इ.5वी तील विद्यार्थीनी गायत्री अमोल येंगे
- कणकवली तालुक्यातील एस. एन. एम. विद्यालय खारेपाटण येथील रुद्र राजू गरजे
- एस. एम. हायस्कूल कणकवली येथील इ.5.वी तील विद्यार्थीनी समिक्षा संदिपकुमार कुंभार
- सावंतवाडी तालुक्यातील कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नं.2 येथील इ. 5.वी तील विद्यार्थी दुर्वांक किशोर वालावलकर
- कणकवली तालुक्यातील सेंट उर्सुला स्कूल वरवडे येथील अनोन्या अनिल तांबे
- मालवण तालुक्यातील अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल येथील श्रेयस चंद्रशेखर बर्वे यांचा समावेश आहे.












This is a good tip particularly to those fresh to the blogosphere.
Simple but very precise information… Many thanks for sharing this one.
A must read article!