पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता!
पुणे:- पुणे महापालिकेच्यावतीने आयोजित ‘माझी माती माझा देश’ अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय येथे शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, नागरिकांच्या मनात देशाविषयी गौरवाची भावना असणे आणि भारताच्या वैभवशाली इतिहासाची चांगली मांडणी करून जगासमोर आणणे गरजेचे आहे. देशाचे वैभव, इतिहास, संस्कृती आणि परंपरा नव्याने समोर आणणे आणि नागरिकांना माहीत असणे देशाच्या ऐक्यासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी देशपातळीवर ‘माझी माती माझा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांचे स्मरण, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि नव्या पिढीपर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास पोहोचविणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी रत्ने जन्माला आली त्या मातीला वंदन करण्यासाठी आयोजित ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेने चांगले काम केले आहे, यासाठीचा लोकसहभागाही स्तुत्य आहे, असे त्यांनी सांगितले.
पुणे येथील एमआयटी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या कारगिल युद्धात शहीद जवानांच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
प्रास्ताविकात आयुक्त विक्रमकुमार यांनी महानगरपालिकेने ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. शहरातील ३३ हजार नागरिकांनी पंचप्रण शपथ घेतली आणि विविध प्रभागात ११ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली.
पालकमंत्र्यांच्या हस्ते शहरात ‘माझी माती माझा देश’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमांवर आधारित चित्रफितीचे अनावरण करण्यात आले. यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. श्री.पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिक, वीर जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
यानंतर सन २०२३-२४ मध्ये मुदतीत मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकांना प्रोत्साहन देण्याकरिता पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित लॉटरी योजनेची सोडत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आली.
तत्पूर्वी छत्रपती संभाजी उद्यान येथे पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते अमृत वाटिकेचे उदघाटन करण्यात आले आणि अमृत कलश पूजन करण्यात आले. हा अमृत कलश आयुक्त विक्रमकुमार यांनी पालकमंत्र्यांकडे सुपूर्द केला. अमृत वाटिकेत बकुळ, सोनचाफा, कांचन, ताम्हण, बहावा आदी ७५ रोपांची लागवड करण्यात आली. अमृत वाटिकेत पर्यावरण पूरक रोपे लावण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.