शिधावाटप पत्रिका कार्यालयातील अंदाधुंदी कारभाराविरोधात आमदार प्रताप सरनाईक आक्रमक!

मुंबई:- सर्वसामान्य कष्टकरी गरीब जनतेसाठी शासन शिधावाटप पत्रिकेद्वारे (रेशनकार्ड) अत्यावश्यक असणारे अन्नधान्य पुरविते. मात्र शिधावाटप नव्याने पत्रिका काढणे, त्यातील नाव कमी- जास्त करणे, पत्ता बदलणे, दुय्यम प्रत काढणे; अशा महत्त्वाच्या कामांसाठी जेव्हा शिधावाटप पत्रिका कार्यालयात सर्वसामान्य नागरिक जातात तेव्हा त्यांना येणारे अनुभव अतिशय संतापजनक असतात.

`सरकारी काम सहा महिने थांब!’ असा शासकीय कामाबाबत नेहमी कटू अनुभव येतोच; शिवाय उद्या या- नंतर या… संबंधित क्लार्क आला नाही… अशी अमुक तमुक कारणं सांगून अक्षरशः शिधापत्रिकाधारकांना विनाकारण त्रास दिला जातो; परंतु तेच काम एजंटला दिले की दोन-तीन दिवसात होते; अगदी विनासायास! त्यासाठी हजारो रुपये एजंटला द्यावे लागतात. हे वास्तव कमीअधिक प्रमाणात राज्यातील शिधावाटप पत्रिका कार्यालयात आहे. ह्या सर्व गैर गोष्टी राजकीय पुढार्‍यांना-लोकप्रतिनिधींना माहीत असतात. पण उभी राहिलेली राक्षसी यंत्रणा- सर्वसामान्य जनतेला पीडादायक असणारी प्रशासकीय व्यवस्था कोणी मोडीत काढत नाही. त्यामुळे त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागतो.

शिधावाटप पत्रिकेची आवश्यकता कष्टकरी गरीब जनतेला असते आणि त्यामुळे साहजिकच शिधावाटप कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा फटका त्यांना बसतो. त्याची दखल आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतली आणि ते स्वतः शिधावाटप पत्रिका कार्यालयात गेले व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शिधावाटप पत्रिका कार्यालयातील अंदाधुंद कारभार कसा चालतो? ते समजून येते.

सत्ताधारी पक्षाचे कर्तव्यदक्ष आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखविलेली सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबतची तत्परता कौतुकास्पद आहे. शिधावाटप पत्रिका कार्यालयात कर्मचाऱ्याकडून-अधिकाऱ्यांकडून जनतेची अडवणूक केली जाते, त्यावर प्रतिबंध घालायला हवा. ह्या अधिकाऱ्यांना कायद्याची भाषा समजणार नाही; त्यांना आमदार प्रताप सरनाईक यांचीच कडक भाषा समजून येईल; कारण ते अधिकारी खरोखरच मस्तवालपणेच वागतात.

प्रस्तुत वृत्ताचे लेखन करणाऱ्या प्रतिनिधीने असाच अनुभव शिधावाटप पत्रिका कार्यालयातून घेतला आहे. हजारो लोकांना अशा मस्तवाल अधिकाऱ्यांचा त्रास होतोय. सामांन्याचे आर्थिक शोषण होते, त्यांचे अनेक दिवस वाया जातात, अधिकाऱ्यांच्या हातापाया पडावे लागते. तरीही शिधावाटप पत्रिका संबंधित कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. मात्र तेच काम एजंट एक-दोन दिवसात करतो. याबाबत संबंधित मंत्र्यांनी – मुख्यमंत्र्यांनी उपयोजना केल्या पाहिजेत; अशी जनतेची मागणी आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचे मनःपूर्वक कौतुक करावेच लागेल. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडणारा आमदार हा खरा आदर्श लोकप्रतिनिधी असतो. आमदार प्रताप सरनाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतर ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागातील शिधावाटप पत्रिका कार्यालयात सामान्य माणसांची काम वेळेवर होतात की नाही? ह्याची दखल घेतली पाहिजे; असं मत अनेकांनी आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केले.

You cannot copy content of this page