परिवहन मंत्रांच्या जिल्ह्यातच जर महामंडळाचा बेफिकीरपणा…
वैभववाडी-बोरीवली एसटी रिझर्व्हेशनात सावळा गोंधळ! प्रवाशांना नाहक त्रास कशासाठी?
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- गणेशोत्सव काळात कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले होते. गणेश विसर्जनानंतर गेल्या दोन- तीन दिवसांपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. कोकणात दाखल होताना रस्त्यांची दुरवस्था पाहता चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. शिवाय परतीच्या प्रवास देखील त्रासदायकच ठरत आहे.
शुक्रवार दि.१७ सप्टेंबर रोजी वैभववाडी एसटी स्थानकात सायंकाळी ०६.०० च्या सुमारास प्रवाशांचा आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. वैभववाडी ते बोरीवली या दोन गाड्या ऑनलाईन बुकींगवेळी दाखवल्या होत्या. मात्र प्रवाशांची संख्या घटल्याने महामंडळाची एकच गाडी काल वैभववाडी बस स्थानकात दाखल झाली. त्यामुळे एकाच सिट नंबरचे दोन रिझर्व्हेशन अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाय वैभववाडी ते बोरीवली हा साधारण ५०० कि.मी. चा प्रवास त्यात रस्त्यांची सद्यःस्थिती पाहता वैभववाडी स्थानकात दाखल झालेली वैभववाडी- बोरीवली एस टी म्हणजे साक्षात यमदूतचं… रस्त्यांची दुरवस्था पाहता लांबच्या प्रवासासाठी महामंडळाने सुस्थितीतील एस टी बस प्रवाशांना उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र काल वैभववाडी- बोरीवली एसटीची अंतर्गत अवस्था व एस टी च्या सिट मोडकळीस आलेल्या तसेच एकाच नंबरच्या सिटचे डबल रिझर्व्हेशन अशी परिस्थिती निर्माण झाली होती. एक महिना अगोदर रिझर्व्हेशन करून देखील आम्हाला रिझर्व्हेशन सुविधा मिळत नाही. त्यामुळे प्रवाशी चांगलेच आक्रमक झाले होते. या बस मधून आम्ही प्रवास करणार नाही असा पवित्रा प्रवाशांनी घेतला होता. सदर घटनेची माहिती मिळताच ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन.पाटील, सचिव श्री.संदेश तुळसणकर, महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या जिल्हाध्यक्ष श्री. तेजस साळुंखे एस टी स्थानकात दाखल झाले. प्रा.एस.एन.पाटील, श्री. संदेश तुळसणकर, श्री.तेजस साळुंखे व वाहतूक नियंत्रक भोवड यांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच वेळानंतर त्यांची मध्यस्ती सफल झाली. प्रवाशांची समजूत काढून वैभववाडी – बोरिवली एस टी मार्गस्थ झाली.
एस टी महामंडळाकडे सुस्थितीतील एस टी बस उपलब्ध असताना देखील प्रवाशांच्या जिवाशी चाललेला हा खेळ व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता एसटी बसकडे प्रवाशांनी पाठ फिरवलेली पहायला मिळते. शिवाय परिवहन मंत्रांच्या जिल्ह्यातच जर महामंडळाचा बेफिकीरपणा असेल तर इतर ठिकाणच्या एस टी सुविधा काय असतील? याचा एस टी महामंडळाच्या वरिष्ठांनी विचार करून किमान लांब पल्ल्याच्या गाड्या सुस्थितीत पाठवण्याची गरज आहे.