९ ऑक्टोबर २०२१ रोजी चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा

चिपी विमानतळ सेवा सुरू करण्यास परवानगी

मुंबई, दि. २० : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू करण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (DGCA) ने परवानगी दिली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी कोकण दौऱ्यावर असताना चिपी विमानतळ सुरू करण्याचा शब्द कोकणवासियांना दिला होता. कोरोनाकाळात सुद्धा विकास कामाला गती देऊन मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती केली आहे. सिंधुदुर्गवासीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न या शासनाने प्रत्यक्षात उतरवले आहे. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून १०० विद्यार्थी क्षमतेच्या या महाविद्यालयाशी संलग्नित ५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाची २० एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC) नवी दिल्ली यांचेकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष एम.बी.बी.एस. (MBBS) अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याकरिता यावर्षी मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला नक्कीच चालना मिळेल, असेही श्री.सामंत यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.

You cannot copy content of this page