सिंधुदुर्गातील सामाजिक संस्थांचा विधायक उपक्रम!
उच्चशिक्षित मुलांच्या रिक्षाचालक वडिलांचा व जेष्ठ रिक्षाचालकांचा भव्यदिव्य सत्कार!
कणकवली (विजय हडकर)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रिक्षा चालकांची मुले उच्चशिक्षित आहेत, अशा रिक्षाचालकांचा व ज्येष्ठ रिक्षा चालकांचा २५ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते भव्य दिव्य सत्कार आयोजित करण्यात आला असून जेम्स महाराष्ट्र, सिंधुदुर्ग ख्रिश्चन शांतता समिती, ह्यूमन राईट असोसिएशन फाॅर प्रोटेक्शन, कणकवली रिक्षा स्टॅन्ड क्रमांक एक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर विधायक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या रिक्षाचालकांची मुले इंजिनियर, डॉक्टर, वकील, किंवा आयटी सेक्टर, आयआयटीएन, नेव्ही, मिलेक्ट्री, सीए किंवा उच्च पदावर कार्यरत आहेत; अशा रिक्षा चालकांचा व तीस वर्षापेक्षा जास्त रिक्षा सेवा करत आहेत. अशा ज्येष्ठ रिक्षा चालकांचा सत्कार २५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता कणकवली येथील गोपुरी आश्रम पर्यटन निवास केंद्र वागदे येथे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजयकुमार काळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विशेष शाखा सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पराग मातोंडकर, महामार्ग सुरक्षा पथक कणकवली पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे, जेम्स महाराष्ट्र झोनचे अधीक्षक रेव्ह संजय पन्हाळकर, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अधिकारी विलास बगडे, जेम्स कोकण कम्युनिटी केअर वर्कर्सचे अमित पोवार तसेच ख्रिश्चन शांतता समितीचे अनंत चौगुले, ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी यांनी उपस्थित रहावे; असे आवाहन अमित पोवार, संतोष नाईक, सुधीर पराडकर, मंगेश सावंत, मिलिंद सावंत, शरद साटम, रविकांत चांदोसकर, सचिन तळेकर, महेंद्र सावंत, सुनील पाताडे, राजेश बांदेकर, संदीप सावंत, एकनाथ राऊळ, राजकुमार तळेकर, रवी माने यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचा कौतुकास्पद व विधायक उपक्रम पहिल्यांदाच होत असून रिक्षाचालकांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. खऱ्याअर्थाने रिक्षा चालक हा प्रवाशांना सेवा देत असतो. वेळप्रसंगी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहचवत असतो, वृद्धांना सहकार्य करीत असतो. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन केलेली प्रवाशांची सेवा कधीच विसरत येणार नाही. खाकी-पांढऱ्या कपड्यातील ह्या रिक्षा चालकांचे कौतुक फारसे कोणी करीत नाही. त्यांच्याकडे वेगळ्याच नजरेने पहिले जाते. रिक्षा चालक सेवेच्या माध्यमातून मिळणाऱ्या अल्प उत्पनातून आपल्या संसाराचा गाडा हाकत असतो. तरीही तो आपल्या मुलांना उच्चशिक्षण देऊन समाजासमोर जो आदर्श निर्माण करतात; तो वाखाण्याजोगा असतो. त्यांचे कौतुक जाहीररीत्या करण्यासाठी सामाजिक संस्थांनी घेतलेला पुढाकारही लक्षणीय आहे.
सिंधुदुर्गातील सामाजिक संस्थांच्या ह्या विधायक उपक्रमास पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या असून भविष्यातही रिक्षा चालकांच्या विधायक कार्याचे कौतुक होण्यासाठी सिंधुदुर्गातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा; अशी अपेक्षा अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.