आयुष्यमान भारत योजनेमुळे गरीब रुग्णांवर सुलभतेने उपचाराची सुविधा – मुख्यमंत्री
नागपुरातील भवानी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर:- समाजातील वंचित व गरीब रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सुलभपणे सुविधा उपलब्ध होत आहेत. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून राज्यातील ९० टक्के जनतेला उपचाराचा लाभ मिळणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
पूर्व नागपुरातील भवानी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहा मजली इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे यांच्यासह श्री भवानी माता सेवा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
धावपळीच्या युगात आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना अल्पदरात आणि त्यांना परवडेल असे उपचार होणे आवश्यक आहे. भवानी हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब रुग्णांवर अल्पदरात आधुनिक पद्धतीने उपचार व्हावेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
श्री. भवानी माता सेवा समितीने मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट सुरु केल्यामुळे या भागासह जिल्ह्यातील गरीब रुग्णांना अल्प दरात वैद्यकीय सुविधा मिळाव्यात. त्यांना उपचारासाठी दूर जाण्याची गरज राहणार नाही. केंद्र शासनाने आयुष्यमान भारत आणि राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरु केल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
श्री. भवानी माता सेवा समिती ट्रस्टने विक्रमी वेळेत रुग्णालय सुरु करून या भागातील गोरगरीबांसाठी सेवा सुरु करुन दिली आहे. या रुग्णालयाचा मुख्य हेतू सेवाभाव असून रुग्णसेवेची प्रेरणा ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून मिळाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरात सीबीएसई शाळेसाठी जागेची मागणी केली. त्यांच्या मागणीनुसार पुरेशी जागा शोधण्यास सांगून त्याचा पाठपुरावा करावा. योग्य पाठपुरावा केल्यास शासनाकडून भविष्यात त्यासाठी नक्कीच मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच येत्या काळात या भागात लवकरच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल. कोणीही अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन केले. स्थानिक तरुणांच्या हाताला काम देऊन पूर्वीपेक्षा चांगले आणि उत्तम करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गेल्या पाच वर्षांत नागपूरचे चित्र बदलले असून, भविष्यातही विकासकामांचा वेग प्रचंड असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना सांगितले, श्री. भवानी माता सेवा समितीचे पदाधिकारी पांडुरंग मेहर यांच्या अथक प्रयत्नातून रुग्णालयाचे काम विक्रमी वेळेत पूर्ण झाले. देशभरात मोठ्या ट्रस्टची वेगवेगळी हॉस्पिटल्स, शाळा, कॉलेजेस आहेत. आता या भागात मेडिकल कॉलेज सुरु करण्यासाठी पुरेशी जागा शोधून ठेवा. त्यामुळे स्थानिक तरुणांना इथेच मेडिकलचे शिक्षण घेता येईल. त्यांना रोजगार मिळेल आणि सोबतच गरीबांवर शासकीय दरात उपचार होतील, असे त्यांनी सांगितले.
सध्या या हॉस्पिटलमध्ये एमआरआय आणि हृदयरोगावर उपचार करण्यासाठी केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेत नोंदणी करण्याचे सांगून नितीन गडकरी यांनी केंद्र व राज्य शासनाकडून येथे कॅथलॅब आणि एमआरआयचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. कमीत कमी पैशात गरीबांची सेवा व्हावी, हा मुख्य उद्देश असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पारडी उड्डाणपुलासाठी जागा आणि नगरोत्थानमधून निधी दिल्याचेही यावेळी सांगितले.
स्वच्छ शहर, सुंदर रस्त्यांसोबत २४ तास वीज आणि पाणीपुरवठा करुन देणार असून, आरोग्यविषयक समस्यांवरही आता भवानी हॉस्पिटलच्या माध्यमातून तोडगा काढण्यात येत आहे. पूर्व नागपुरात सिंम्बॉयसिस, साई, पारडी उड्डाणपुल, अंडरपास आदी मोठ्या प्रकल्पांमुळे या भागाचे चित्र पालटले असल्याचे सांगून विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नामुळे मिहानमध्ये आजतागायत २२ हजारावर तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला असून, येत्या काळात हा आकडा ५० हजारावर जाणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नामुळे १०० टक्के अनुदानावर सौरपॅनेल बसवल्यामुळे येत्या २५ वर्षासाठी हॉस्पिटलचा वीजबिलाचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे हॉस्पिटल स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासोबतच गरीब रुग्णांना अल्पदरात सर्वोत्तम सेवा देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्री. भवानी माता सेवा समितीला केले.
यावेळी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, सोलार इंडियाचे सत्यनारायण नुवाल, हल्दीराम फूड्सचे शिवकिशन अग्रवाल, माजी आमदार मोहन मते, नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे, सुरुची फूड्सचे सुभाष जैन आणि सोनू मोनू इंडस्ट्रीजचे अशोक गोयल आदी उपस्थित होते.