कोरोनाने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणेसाठी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- सिंधुदुर्गात कोरोना महामारीने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचे रुग्ण वाढ थांबविणेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत याव्यात; अशी मागणी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हानिरिक्षक मनोज तोरसकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारीने मृत्यू रोखण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी, वैद्यकिय तज्ञांशी, शासनाच्या विविध अधिकाऱ्यांशी आणि सामाजिक कार्यकत्यांशी सखोल चर्चा केल्यानंतर काही मुद्दे आमच्या लक्षात आले आणि त्यातून काही उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयात कोरोना महामारीने होत असलेले मृत्यु आणि कोरोनाचे रुग्ण वाढ थांबविणे शक्य आहे; असे आम्हाला वाटते. म्हणून सदर उपाययोजना आपल्यासमोर ठेवत आहोत.

१) जिल्हा शल्य चिकित्सक पद भरण्यात यावे.
२) सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात फिजिशिअन ह्या पदावर एकही डॉक्टर नाही. एकही छातीफुफ्फुस तज्ञ (Chest Lung Specialist) डॉक्टर नाही आणि अतिदक्षता विभागात अत्यावश्यक असणारे Intensivist तज्ञ नाहीत. असे असताना कारोनाने बाधिक रुग्णांना वाचविणार कसे? म्हणून आवश्यक असलेल्या संख्येने वरील वैद्यकीय तज्ञ तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत.
३) त्याप्रमाणे अन्य वैद्यकिय तज्ञ, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी अन्य आवश्यक कर्मचारी सुध्दा अपुरा आहे. त्यामुळे आताच्या वैद्यकिय यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो आणि जिल्ह्यात कोरोना महामारीने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
४) डॉक्टरांची प्रचंड कमतरता भासत असताना सिंधुदुर्गासह अन्य दोन बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात बीएचएमएस डॉक्टरांना कंत्राटी सेवेतून वगळण्यात आले. किमान सिंधुदुर्गात तरी बीएचएमएस डॉक्टरांना त्वरीत रुजू करुन घ्यावे.
५) कोरोना रुग्णांबाबत ऑक्सीजन लेव्हल खूपच महत्वाची आहे. जिल्ह्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपकेद्रात Pulse Oximeters पुरेशा संख्येने उपलब्ध नाहीत आणि जे Pulse Oximeters आहेत ते नादुरुस्त असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. म्हणूनच दर्जेदार Pulse Oximeters त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, हॅण्ड वॉश, पीपीई किट, हॅण्ड ग्लोज व इतर आवश्यक साहीत्य त्वरीत जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करुन द्यावेत.
६) सिंधुदुर्गात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकांचा वापर मर्यादेपेक्षा जास्त झालेला आहे. त्यासर्व रुग्णवाहीका नव्याने मिळणे आवश्यक आहेत. १०८ क्रमांक रुग्णवाहीका पायलट (ड्रायव्हर) तुटपुंज्या पगारात अधिक काम करतात. त्यांचे वेतन त्वरीत वाढवावे आणि यांना विमा कवच मिळावे. जेणेकरुन रुग्णवाहीकांची कार्यक्षमता वाढेल आणि रुग्णांना वेळेत रुग्णवाहीका उपलब्ध होईल.
७) किमान एक महिन्याकरिता मुंबई, पूणे ह्या शहरातील अनुभवी डॉक्टरांचे पथक सिंधुदुर्गात त्वरीत पाठवावे, जेणेकरुन लगेच मृत्युदर कमी होईल आणि एका महिन्याचा कालावधीत जिल्ह्यात कार्यरत असणारे डॉक्टर अनुभव संपन्न होतील व भविष्यात त्याचा जिल्हयातील रुग्णांना फायदा होईल.
८) मास्क वापरणे, शारिरीक दुरी ठेवणे, स्वच्छता राखणे, टेस्ट करुन घेणे, लसीकरण करुन घेणे, रोगप्रतिकार शक्ती वाढविणे वगैरे बाबत जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी विशेष मोहीम आखणे गरजेचे आहे. त्यासाठी खाजगी डॉक्टर्स, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांना सामावून घ्यायला हवे.
९) शासनाच्या वैद्यकिय विभागात कार्यरत असणाऱ्या सर्वांची काळजी घेणे महत्वाचे आहे. ड्युटीवर असताना त्यांना आवश्यक त्या सेवा उपलब्ध करुन द्यायलाच पाहीजेत.
१०)कंत्राटी तत्वावर काही आरोय कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ, तंत्रज्ञ, नर्सेस, डॉक्टर यांची नेमणूक झाली, पण त्यांचे वेतन झाले नाही.
११) कोविड-१९ संसर्गाचा रिपोर्ट खूप दिवसांनी येतो. तोपर्यंत रुग्ण इतरांच्या संपर्कात येतो किंवा सदर रुग्ण गंभीर होतो. त्यामुळे कोविड १९ संसर्गाचा रिपोर्ट हा २४ तासामध्ये आलाच पाहीजे, अशा पध्दतीने आरोग्य यंत्रणेला काम करणे आवश्यक आहे.
१२) कोविड-१९ संशयित रुग्णांची किंवा संपर्कातील व्यक्तींची रॅपीड टेस्ट केली जाते, बहुतांशी वेळा रॅपिड टेस्ट निगेटीव्ह असते, मात्र निगेटीव्ह असलेल्या व्यक्तीची RT-PCR टेस्ट मात्र पॉझीटीव्ह येते. याचीही गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
१३) ग्रामीण भागात अनेक खाजगी डॉक्टर चांगली सेवा देत आहेत; परंतु ह्या डॉक्टरांनी अशा रुग्णांवर उपचार करताना तीन चार दिवसापेक्षा जास्त दिवस वाट न पहाता टेस्ट करण्यास प्रेमाने-सक्तीने सांगावे व तो अहवाल जिल्हा आरोय यंत्रणेला द्यावा म्हणजे निदान चाचणी लवकर होऊन रुग्णांना उपचार त्वरीत मिळतील.
१४) जिल्ह्यातील सध्याची करोना स्थिती पहाता आता पाच डॉक्टरांची टीम नको, तर कायम स्वरुपी वरील तज्ञ डॉक्टरची आवश्यकता आहे.
१५) ऑक्सीजन प्लॅन्ट उभारुन आणि कोरोना लसीकरणासाठी यंत्रणा उभारुन शासनाने गौरवास्पद कार्य केलेले आहे; परंतु सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता प्रभाव पहाता कोरोना प्रतिबंधीत लसीचे ४ लाख डोस त्वरीत उपलब्ध करुन द्यावेत.
१६) लसीचा पहीला डोस घेतलेल्या व्यक्तीना लसीच्या तुटवडयामुळे दुसरा डोस वेळेवर मिळत नाही. त्या अनुषंगाने सुध्दा खालील मुद्यांवर निर्णय घेणे गरजेचे आहे. अ) लसीचा पहीला डोस घेतलेल्या व्यक्तींना लसीच्या दुसरा डोस वेळेवर मिळाला नाही तर काय करायचे? ब) त्याचा आरोय यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो का? क) दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर करोना विषाणूशी लढण्यास आवश्यक अँटीबॉडीज तयार होणार नाहीत का? ड) रुग्ण कोरोना पॉझीटीव्ह आला तर त्याला लसीचा डोस किती दिवसानंतर घेणे आवश्यक आहे? इ) दुसरा डोस वेळेत मिळाला नाहीतर त्याची सुचना कोठे द्यायची? ह्या संदर्भात जनतेच्या मनातील गोंधळ थांबविण्यासाठी तज्ञांकडून मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page