दिल्लीत लाल किल्ला मेट्रोजवळ आय-२० कारमध्ये स्फोट; १० ठार, १५ जखमी

नवी दिल्ली:- राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी ह्यूंदाई आय-२० कारमध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटात १० जण ठार झाले असून, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळील काचा फुटल्या आणि आजूबाजूच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.

स्फोट लाल किल्ल्यापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर घडला, जो देशातील अति सुरक्षित क्षेत्र मानला जातो. जखमींना तात्काळ LNJP रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि स्पेशल ब्रांचची पथके स्फोटानंतर १० मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. परिसर पूर्णपणे खाली करण्यात आला असून, बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ तपास करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेचा आढावा घेतला असून, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि दिल्ली पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. स्फोट दहशतवादी कृत्य असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान दिल्लीतून काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली, ज्यामुळे या घटनेचा संबंध तपासला जात आहे.

स्फोटामुळे देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोलकाता, बेंगळुरूसह प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी मृतांच्या कुटुंबीयांना शोकसंवेदना व्यक्त केल्या.

दरम्यान, चांदणी चौक बाजार संघटनेने मंगळवारी (११ नोव्हेंबर) बाजारपेठ बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बाजार संघटना अध्यक्षांनी सांगितले की, “ही दुर्दैवी घटना लक्षात घेऊन व्यापारी बंद पाळतील आणि शोक व्यक्त करतील.”

तपास यंत्रणा सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांच्या जबान्या आणि अवशेषांचा अभ्यास करत आहेत. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

error: Content is protected !!