अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या आक्रमक महिला नेत्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन
नवीदिल्ली:- राजकारणात राहूनही लोककल्याणकारी निर्णय घेऊन आपला ठसा उमठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ६६ वर्षी त्यांना मृत्यूने गाठले. अचानक प्रकृती चिंताजनक झाल्याने मंगळवारी रात्री त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती स्वराज कौशल आणि कन्या बांसुरी आहेत.
प्रकृतीमुळे त्यांनी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर त्यांनी ट्वीट करून आनंद व्यक्त केला. ‘मोदीजी धन्यवाद. मी आयुष्यभर या दिवसाची वाट पाहात होते.’ त्यांचे हे ट्वीट अखेरचे ठरले. अभ्यासू, दूरदृष्टी असलेल्या आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम नव्या भारताला जगभरात सामर्थ्यवान बनविणारे होते.