माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर अटक
नवीदिल्ली:- आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना रात्री दहाच्या सुमारास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतले आणि अटक केली.
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. यासंदर्भात बुधवारी अनेक घडामोडीं घडल्या. अटक टाळण्यासाठी पी. चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले. सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळाला नाही. सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी त्यांचा शोध घेत होते. चिदंबरम देश सोडून जाऊ नयेत यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरोधात ‘लूक आऊट’ नोटीस जारी केली होती.
पी. चिदंबरम यांनी रात्री काँग्रेसच्या मुख्यालयात वकिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन स्वत:वरील आणि मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले. ‘आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात मी किंवा माझा मुलगा आरोपी नाही. आमच्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. आम्हाला या घोटाळ्यात गोवण्यात आले आहे. आमच्यावरील सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनी कायद्याचे पालन करावे. हा खटला लढण्यासाठी वकिलांसोबत तयारी करत होतो. त्यामुळे तुमच्यासमोर येऊ शकलो नाही. स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशावेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन.’ असे पत्रकार परिषदेत म्हणाले. पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम काँग्रेस कार्यालयातून त्यांच्या घरी गेले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.