माल व प्रवासी वाहतूक करणारे व्यावसायिक `हॉर्न वाजवा’ आंदोलन छेडणार!
कणकवली:- गेल्या अडीच-तीन महिन्यात लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व वाहतूक व्यवसाय उद्धवस्थ झाला आहे. राज्य सरकारने माल व प्रवासी वाहतूक करणाऱया व्यावसायिकांना कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आर्थिक दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला नाही, त्याबाबत अनेकांनी राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून मागण्या केल्या आहेत. मनसेच्या वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी याबाबत राज्य शासनाला जाग आणण्यासाठी दि. १२ जून रोजी सायंकाळी ५ वा. एका मिनीटासाठी `हॉर्न वाजवा’ आंदोलन छेडण्याचे आवाहन केले आहे. यात सर्वानी सहभागी व्हावे, असे आवहन मनसेचे माजी आमदार तथा सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे.
करोना संकटकाळात वाहतूक व्यवसायाला जो मोठा आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे वाहतूक क्षेत्रातील सर्वांचे प्रचंड नुकसान झालं आहे. भविष्यात हे संपूर्ण क्षेत्र आर्थिक मंदीच्या दुष्टचक्रात अडकू नये, यासाठी सार्वजनिक परिवहन मंत्र्यांनी एखादं ठोस धोरण आखण गरजेचं आहे. यात अगदी रिक्षापासून ते सर्वप्रवासी वाहतूक करणारे तसेच मालवाहतूक करणाऱया सर्वच व्यावसायिकांना मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच वाहतूक व्यवसायाशी संबंधित सर्वांचा आक्रोश बहिऱया सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी दि. १२ जून रोजी हे आंदोलन छेडण्यात येत आहे. यात सर्व प्रवासी वाहतूक, मालवाहतूक करणाऱया वाहनांनी सायंकाळी ५ वा. एक मिनीटासाठी हॉर्न वाजवून या आंदोलनात सहभागी व्हावयाचे आहे. तरी सर्वानी एकत्रित येत यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री़ उपरकर यांनी केले आहे.