जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची माणुसकी! 62 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – ऑक्सिजनची पातळी 65 पर्यंत कमी झालेली. धाप लागलेली अशा परिस्थितीत आम्ही आमच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तेथील डॉक्टर्समधील व्यवसायापलीकडील माणुसकीचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त केली आहे, सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांनी.

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. त्यावेळीच सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील 62 वर्षीय रुग्ण जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी आले. ज्येष्ठ नागरिक, ऑक्जिसनची पातळी 65 पर्यंत घसरलेली. रुग्णाची प्रकृती नाजूक बनलेली. खाटा उपलब्ध नसल्याची परिस्थिती. शेवटी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे त्यांना आणले. तिथेही सुरुवातीस खाट उपलब्ध नव्हती. पण, खाट उपलब्ध नाही म्हणून उपचार थांबवले नाही. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स यांनी तत्परता दाखवत केलेले उपचार आणि सुश्रुषा यामुळे आज या 62 वर्षांच्या आजी कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत.

याकाळात रुग्णालयातील आपल्या अनुभवाविषयी त्यांचे नातेवाईक सांगतात, त्यांची ऑक्सिजनची पातळी 65 पर्यंत खाली आली होती. ऑक्सिजनच्या आधारावर ठेवणे अत्यंत गरजेचे होते. खासगी डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. पण, सावंतवाडी, कुडाळ या ठिकाणी ऑक्सिजन खाटा उपलब्ध झाल्या नाहीत. म्हणून आम्ही त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आणले. तिथेही सुरुवातीस खाट मिळाली नाही. पण, खाट नाही म्हणून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सनी उपचार थांबवले नाहीत. त्यांना रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन देण्यात आला. खाट उपलब्ध झाल्या झाल्या त्यांना दाखल करून घेतले आणि उपचारांना सुरुवात केली. एचआरसीटी स्कॅन केल्यानंतर त्याचा स्कोअर 18 आला. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष दिले जात होते. दिवसातून चार वेळा डॉक्टर्स तपासणीसाठी येत होते. त्यांच्या आरोग्याविषयी नियमितपणे आम्हाला माहिती दिली जात होती. रुग्णासाठी सकस आणि चांगले जेवण दिले जात होते. सुरुवातीस आम्ही घरून डबा आणण्याचा निर्णय घेतला होता. पण, डॉक्टर्सनी सल्ला दिला की घरून डबा आणू नका. कोरोना वॉर्डमधील डबा घरी घेऊन जाण्यामुळे घरातील लोकांनाही कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यामुळे तुम्ही येथीलच जेवण द्या. डॉक्टरांचा सल्ला आम्ही ऐकला आणि रुग्णालयातीलच जेवण दिले. जेवणही चांगले होते. रोज अंडी दिली जात होती, काढा दिला जात होता. नाश्ट्याचीही चांगली सोय होती. डॉक्टर्स, नर्स अगदी व्यवस्थितपणे लक्ष देत होते. नियमीतपणे इतर तपासण्याही करण्यात येत होत्या. घरी सोडण्याच्या आदल्या दिवशी रक्त तपासणीमध्ये शुगर वाढल्याचे दिसले. त्यामुळे आम्ही पुन्हा घाबरलो होते. पण, डॉक्टर्सनी सर्व माहिती दिली व शुगरसाठी काही गोळ्या सुरू केल्या. आणखी काही दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील असेही सांगितले. या संपूर्ण काळामध्ये डॉक्टरांमधील माणुसकीचे आम्हाला दर्शन घडले.

You cannot copy content of this page