क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या जनरल रजिस्टरमध्ये बेकायदेशीरपणे नोंद बदल?

क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या जनरल रजिस्टरमध्ये
खोटे जात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी बेकायदेशीरपणे नोंद बदल?

पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास मुख्याध्यापक व संस्था पदाधिकाऱ्यांचा विलंब का?

सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी):- मुंबईतील परळ येथील क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या जनरल रजिस्टरमध्ये बेकायदेशीरपणे नोंद बदल केल्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यास मुख्याध्यापक व संस्था पदाधिकारी विलंब का करीत आहेत? असा प्रश्न संस्थेच्या अनेक सभासदांनी उपस्थित केला असून ह्याबाबत संस्थेचे क्रियाशील सभासद पत्रकार नरेंद्र हडकर यांनीही संस्थेकडे आणि भोईवाडा पोलीस स्टेशनला लेखी पत्र देऊन संबंधितांवर त्वरित गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.

ह्याबाबत आमच्या विशेष प्रतिनिधीने दिलेले सविस्तर वृत्त असे की, मुंबईतील परळ येथील क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुल हे नामांकित आहे. ह्या प्रशालेतून शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी नामवंत सुप्रसिद्ध व्यक्ती म्हणून विविध क्षेत्रात कार्य करीत आहेत. नुकताच १८ डिसेंबर २०२५ रोजी मिठबांव येथील क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुलचा शताब्दी महोत्सव मुंबईतील नरेपार्क मैदानात मोठ्या दिमाखात साजरा झाला. त्याचा फायदा घेत हायस्कुलच्या जनरल रजिस्टरमध्ये बेकायदेशीरपणे नोंद बदल करण्यात आली व बेकायदेशीरपणे छायाचित्रे काढण्यात आली; असे समजते. याबाबत हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार करून गुन्हा दाखल करणे अत्यावश्यक होते किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्वरित कळविणे गरजेचे होते. मात्र मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे रीतसर तक्रारही केली नाही आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही कळविले नाही.

(हायस्कुलचे जनरल रजिस्टर म्हणजे काय? त्यात बदल का केला जातो? उदाहरणार्थ- हायस्कुलच्या जनरल रजिस्टरमध्ये ज्याप्रमाणे नोंद असते त्यानुसार माजी विद्यार्थ्यांना मागणी केल्यावर शाळा सोडल्याचा दाखल दिला जातो. जनरल रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात बदल करून किंवा खाडाखोड करून आरक्षणाचा लाभ होईल, असा जातीत बदल केला जातो व शाळा सोडल्याचा दाखला दिला जातो.)

ह्याबाबत हायस्कुलच्या शिक्षकांमध्ये आणि संस्थेच्या सभासदांमध्ये कुजबुज सुरु होताच हे प्रकरण आपल्या अंगाशी येईल म्हणून हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी तकलादू कार्यवाही करीत दोनदा प्राथमिक चौकशी करून एका कागदावर अहवाल तयार केला; मात्र त्यावर हायस्कुलचा शिक्काही मारला नाही. असा अर्धवट अहवाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला; असे समजते.

क्षा. म. समाज संस्थेची अधिकृत कार्यकारिणी मंडळाची सभा दिनांक ०८/०१/२०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता संस्थेच्या सभागृहावर संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत सदाशिव डिचोलकर यांच्या अध्येक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेच्या सूचनेतील विषय क्रमांक ३ चा विषय असा होता की, क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुल कार्यालयामधील जनरल रजिस्टरमध्ये नोंद बदलल्याचे निदर्शनास आल्याने चार लिपिक व एक शिपाई यांच्या चौकशी करिता चौकशी समिती गठीत करणे.

ही बाब निदर्शनास येताच क्षा. म. समाज संस्थेचे क्रियाशील सभासद पत्रकार नरेंद्र हडकर यांनी भोईवाडा पोलीस स्टेशनला रीतसर लेखी तक्रार ८ जानेवारी २०२६ रोजी दिली. त्या अर्जात त्यांनी असे म्हटले आहे की, ह्यावरून असे स्पष्ट होते की, क्षा. म. समाज संस्थेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या हायस्कुलच्या कार्यालयातील जनरल रजिस्टर (General Register) मध्ये योग्य शासकीय / सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी नसताना नोंदी बदलण्यात आल्या. सदर प्रकार जाणीवपूर्वक व नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेला असून संस्थेची फसवणूक करणारा, विश्वासघात करणारा आणि सार्वजनिक हिताला बाधा आणणारा आहे. त्यामुळे संस्थेची विश्वासाहर्ता धुळीस मिळणार आहे. जनरल रजिस्टर हा शासकीय व कायदेशीर दस्तऐवज असून त्यामध्ये कोणतीही फेरफार करणे हा दखलपात्र व शिक्षेस पात्र गुन्हा आहे आणि तो गुन्हा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा मुख्याध्यापकांनी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर दाखल करायचा आहे. सदर प्रकरणी संबंधित दोषी व्यक्ती / व्यक्तींविरुद्ध भा.दं.सं. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ (आवश्यक असल्यास ४०९) अन्वये गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी व कायदेशीर कारवाई करावी.

त्याचप्रमाणे पत्रकार नरेंद्र हडकर यांनी क्षा. म. समाज संस्थेच्या अध्यक्ष / सेक्रेटरी / विश्वस्त यांना रीतसर लेखी तक्रार ८ जानेवारी २०२६ रोजी दिली आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा; अशी विनंती केली. त्याची दखलही आजतागायत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली नाही. (संस्थेचे क्रियाशील सभासद जेव्हा संस्थेच्या हितार्थ तक्रारी अर्ज, विनंती अर्ज संस्थेला देतात; तेव्हा त्याची दखल घेतली जात नाही. असा अनुभव संस्थेच्या सभासदांना आहे. )

क्षा. म. समाज संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाची सभा दिनांक ०८/०१/२०२६ रोजी झाली. त्या सभेतही उपस्थित कार्यकारिणी सदस्यांनी बेकायदेशीर कृत्याबद्दल त्वरित पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करा; अशी आक्रमकपणे मागणी केली होती.

असे असूनही १८ जानेवारी २०२६ पर्यंत भोईवाडा पोलीस स्टेशनला हायस्कुलच्या मुख्याध्यापकांनी किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल का केलेला नाही? गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम का होत आहे? असे संतप्त सवाल क्षा. म. समाज संस्थेचे सभासद विचारत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून क्षा. म. समाज डॉ. शिरोडकर हायस्कुलच्या माजी विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या वारसांना जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जनरल रजिस्टरमध्ये बेकायदेशीरपणे नोंद बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही; असे आरोप क्षा. म. समाज संस्थेचे सभासदांनी आमच्या प्रतिनिधीकडे केले असून त्याचीही सखोल चौकशी व्हावी ही मागणी जोर धरत आहे.

(लवकरच ह्या बातमीचा उत्तरार्ध प्रसिद्ध होईल!)

error: Content is protected !!