निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट ही पर्वणी! -अभिनेत्री अक्षता कांबळी
सिंधुदुर्ग:- “निकेत पावसकर यांच्या जगावेगळ्या छंदाची नोंद लिम्का बुक किंवा गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, अशा आमच्या शुभेच्छा आहेत. देशातीलच नव्हे तर जगातीलही विविध व्यक्तिंचे संदेश त्यांनी एकत्र करुन वेगळाच सांस्कृतिक ठेवा जोपासला आहे. या अक्षर घराला भेट म्हणजे पर्वणी आहे!” असे प्रतिपादन अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी केले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला त्यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
अभिनेत्री अक्षता कांबळी ह्या मालवणी अभिनेत्री असल्या तरीदेखील त्यांनी अभिनयाची छाप हॉलीवुडमध्येही पाडली आहे. अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि लघुपटातील भुमिका गाजल्या आहेत. अक्षरघराला भेट देताना त्या म्हणाल्या की, आपण गेली पंधरा वर्ष एक आगळा वेगळा छंद जोपासत आहात. जगभरातील सर्व प्रकारच्या मान्यवरांच्या हस्ताक्षरातील पोस्टकार्ड वरील मजकुरातील संदेश पत्रे संग्रहित केली आहेत.
विशेषत: भारतीय पोस्ट कार्डवर हे संदेश असल्याने आणि ते जगभरातील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यावर संदेश लिहिल्याने खरं तर भारतीय पोस्ट खात्याचा हा मोठा गौरव झालेला आहे. याचीही दखल घेण्याजोगी आहे. या अक्षरघराला भेट म्हणजे एक वेगळीच पर्वणी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी केले. यावेळी निकेत पावसकर यांच्या या संग्रहाच्या वाटचालीबद्दल सविस्तर जाणून घेऊन संग्रहातील संदेश पत्रे पाहिली.