भालाफेकपटू नीरज चोप्राचे जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत जिंकले पहिले सुवर्णपदक

मुंबई:- हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथे सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेत ८८.१७ मीटर भालाफेक करुन भारताला जागतिक ॲथलेटीक्सचं पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

२०२१ च्या टोकियो ऑलिंपिकमधील सुवर्णपदकानंतर, जागतिक ॲथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेतील नीरजची आजची सुवर्ण कामगिरी कोट्यवधी भारतीयांचा सन्मान वाढवणारी, भारतीय क्रीडाक्षेत्राला ऊर्जा देणारी, देशातील तरुण पिढीला खेळांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देणारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीचं कौतुक करुन त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेत आतापर्यंत भारताला केवळ तीन पदके मिळाली आहेत. २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्ज यांनी महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. गेल्यावर्षी नीरज चोप्रा याने रौप्यपदक जिंकले होते. यंदा सुवर्णपदकाला गवसणी घालून त्याने देशासाठी जागतिक ॲथलेटीक्स स्पर्धेतील पदकांचं वर्तुळ पूर्ण केले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी चोप्राच्या सुवर्णकामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

याच स्पर्धेत भालाफेकपटू किशोर जाना याने ८४.७७ मीटर भालाफेक करून पाचवे स्थान मिळविले आहे. भालाफेकपटू डी.पी. मनू याने ८४.१४ मीटर भालाफेक करून सहावे स्थान मिळविले आहे. या दोघांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले असून भविष्यातील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page