कोकण सुपुत्र प्रणय शेट्येला बॉलिवूडची संधी
‘कोकण कोकण’ या गीताचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येला हिंदी चित्रपटासाठी संधी
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- अलीकडेच कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या `कोकण कोकण’ या गाण्याचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येचे नाव हिंदी सिनेसृष्टीत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण आगामी एका हिंदी सिनेमाच्या प्रकल्पासाठी त्याला विचारणा झाल्याची खात्रीलायक बातमी मिळते आहे. त्यामुळे कोकणातील आणखी एक चेहरा लवकरच भारतीय सिनेसृष्टीत झळकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
कोकणाचं वर्णन करणारी अनेक गाणी आजमितीस डिजीटल माध्यमांवर उपलब्ध आहेत. गोमू माहेरला जाते हो नाखवा, कोकणची चेडवा या गीतांनंतर आता द्रौपदी क्रिएशन निर्मित कोकण कोकण या अजरामर गीतानं रसिकप्रेक्षकांच्या हृदयाचा ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे, या गाण्याचं लोकार्पण कोकण रेल्वेत सहप्रवाशांच्या हस्ते करण्यात आलं होतं. हे गाणे तरूणाईत प्रसिद्ध असलेल्या शुभांगी केदार व ए.आर. रेहमान यांचा पट्टशिष्य सार्थक कल्याणी यांनी गायले आहे. या गीताचे दिग्दर्शन सिद्धांत सरफरेने केले असून चिन्मय जाधव याने सिनेमॅटोग्राफी व सहदिग्दर्शनाची भुमिका बजावली आहे. या गीतात सागर कदम व रुचिता शिर्के या नव्या दमाच्या कलाकारांनी उत्तम काम केले आहे. या प्रकल्पानंतर लवकरच अधिकाधिक कोकणातील कलाकरांना घेऊन हळदी विशेष गाणे चित्रीत करणार असल्याचे द्रौपदी क्रिएशनतर्फे कला दिग्दर्शक ओमकार सावंत यांनी जाहीर केले आहे.
कोकण कोकण ह्या बहुचर्चित प्रकल्पानंतर प्रणय शेट्ये आणि टीमसाठी अनेक नविन संधी निर्माण झाल्या आहेत. प्रणय सध्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत असून एका हिंदी निर्मात्याने देखील सिनेमातील गीतलेखन, संगीतासाठी विचारणा केल्याचे नुकतेच कळते आहे. हा प्रकल्प २०२४ पर्यंत पूर्णत्वास जाणार असून याबाबत प्रणय शेट्ये यांस विचारले असता, “नव्या प्रकल्पांवर काम चालू आहे हे खरे आहे.मात्र प्रकल्प पूर्णत्वास जात नाही तोवर कुठलेही भाष्य करणे योग्य नाही! कोकणभूमीने दिलेल्या आशीर्वादामुळे अनेक संधी चालून येतायत ही एक कलाकार म्हणून आनंदाची बाब आहे पण आता जबाबदारी वाढलीय कारण मायबाप रसिकप्रेक्षकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत” असे म्हटले.यानिमित्ताने कोकणातील एक कलाकार भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करणार या चर्चेने कोकण कोकण हे गाणं पुन्हा चर्चेत आलंय.