लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना लावणी गौरव पुरस्कार
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून)- मुंबई येथील लावणी कलावंत महासंघाकडून देण्यात येणारा “लावणी गौरव पुरस्कार नृत्य दिग्दर्शक २०२२” मुळचे ओझरम येथील असलेले लोककला लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे यांना जाहिर झाला आहे. या पुरस्कारामुळे त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
लावणी कलावंत महासंघाकडून वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. या कार्यक्रमात लोककलेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या लोककलावंत तसेच पडद्यामागील कलकारान्चा लावणी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी हा पुरस्कार वितरण १ जुन ला मान्यवरांच्या हस्ते दामोदर हॉल परळ येथे होणार आहे.
सदानंद राणे हे गेली ४० वर्षे लोककलेमध्ये असून लोककला-लोकनृत्य अभ्यासक, संशोधक, ज्येष्ठ नृत्य नाट्य दिग्दर्शक अशी वेगळी ओळख आहे. सह्याद्री वाहिनी, अल्फा टीव्ही, ई टीव्ही अशा विविध वाहिन्यांवरिल लोकनृत्याच्या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून उत्तम काम केले आहे. शासनाच्या अनेक समितीचे ते सदस्य आणि पदाधिकारी असून पदण्यास सांस्कृतिक गृपच्या माध्यमातून ते विविध लोककलांचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांच्या प्रदिर्घ कारकिर्दीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
याशिवाय या कार्यक्रमात कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना देवदूत सन्मान, कोविड काळात महासंघाला सहकार्य केले अशा व्यक्तींना दानशूर सन्मान तर जागतिक महिला दिना निमित्ताने घेण्यात आलेल्या मी आणि माझी कला या स्पर्धेतील विजेत्या महिलांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.