धुळे येथील म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने तत्काळ अधिसूचना काढावी

मुंबई, दि. २०:- धुळे येथे म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने अधिसूचनेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनातील उपसभापती यांच्या दालनात धुळे येथील म्हाडाने केलेल्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी या बैठकीला विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, गृहनिर्माणचे उपसचिव सुनिल तांबोरे, नगरविकासचे उपसचिव श्री.जाधव, धुळे महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, नाशिक म्हाडाचे मुख्याधिकारी टी.डी.कासार तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे धुळे जिल्ह्याच्या प्रातांधिकारी तृप्ती धोडमिसे, शेतकरी प्रतिनिधी घनश्याम खंडेलवाल यावेळी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व इतर सर्व उत्पन्न गटासाठी गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी मौजे देवपूर, जिल्हा- धुळे येथून म्हाडाने शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या. मात्र या जमिनींचा मोबदला अद्याप जमिन मालकांना देण्यात आलेला नाही. या कामामध्ये सन २०१५ ते २०२२ पर्यंत खूप मोठा कालावधी उलटून गेला आहे. जेव्हा शासनाकडून एखाद्या विकासकामासाठी भूसंपादन केले जाते तेव्हा ज्या गतीने भूसंपादन होते त्याच गतीने जमिन मालकांना मोबदला दिला तर कोणाचीच तक्रार राहणार नाही. या विषयाबाबत म्हाडा, विधी व न्याय विभाग तसेच प्रातांधिकारी-धुळे यांची बैठक घेवून या प्रकरणासंदर्भात गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. विधी व न्याय विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतरच म्हाडा याबाबत कार्यवाही करू शकते त्यामुळे विधी व न्याय व विभागाने मार्गदर्शक सूचनेप्रमाणे तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना या बैठकीत उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

You cannot copy content of this page