देशात ५९.२५ टक्के, तर महाराष्ट्रात ५६.७८ टक्के मतदान, राज्यात एकूण मतदान ६०.६८ टक्के
नवीदिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सायंकाळी सहा वाजता संपलं. मतदानाची सरासरी टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली असून देशात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५९.२५ टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात ५६.७८ टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्यात देशात ७२ जागांवर तर महाराष्ट्रातील १७ मतदार संघात मतदान झालं. राज्यात यंदा एकूण मतदान ६०.६८ टक्के झाले. अद्यापही तीन टप्प्यांचं मतदान बाकी आहे.
महाराष्ट्रात कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर, मावळ, शिर्डी, शिरूर, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक आणि मुंबईच्या सहा जागांवर आज मतदान पार पडलं.
पश्चिम बंगालमध्ये बंपर म्हणजे ७६.४४ टक्के मतदान झालं. तर महाराष्ट्रात सर्वांत कमी म्हणजे ५६.७८ टक्के इतकं मतदान झालं. मध्य प्रदेश ६६.१४ टक्के, बिहार ५८.९२ टक्के, जम्मू-काश्मीर ९.७९ टक्के, ओडिशा ६८ टक्के, राजस्थान ६४.५० टक्के, यूपी ५७.५८ टक्के तर झारखंडमध्ये ६३.७७ टक्के इतके मतदान झाले.
चौथ्या टप्प्यातील मतदानाची वैशिष्टये-
१) मुंबईत अनेक ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
२) अनेक सिनेतारकांसह राजकीय नेत्यांनी रांगेत उभं राहून मतदान केलं.
३) कडकडीत उन आणि सलग सुट्ट्यांचा विपरीत परिणाम मतदानावर झाला.
४) चौथ्या टप्प्यात आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबार मतदारसंघात सर्वाधिक ६७.६४ टक्के मतदान.
५) शहरी भागात मतदारांचा उत्साह ग्रामीण भागातील मतदारांपेक्षा कमी होता.
६) महाराष्ट्रामध्ये एकूण ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ९८ इतक्या मतदारांपैकी ५ कोटी ३७ लाख ४१ हजार २०४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
७) पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के मतदान झाले आहे.
८) आचारसंहिता काळात सोने आणि रोकड असा १५७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निवडणूक काळात १७ हजार ५०० गुन्हे दाखल.