कोकणच्या महामार्गाची ५ सप्टेंबरला भव्य जनआंदोलन… आता तरी शासन लक्ष देणार का?

सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- कोकणात जाणारा महामार्ग नेहमीच दुर्लक्षित होतो आणि तो महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनलाय. महामार्ग अपूर्णावस्थेत असून पर्यायी व्यवस्था नसल्याने जीवघेणा प्रवास करताना आजपर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. तरीही प्रशासनाला-सरकारला जाग येत नाही. त्यासाठी कोकण हायवे समन्वय समितीतर्फे रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत मानवी साखळी जन आंदोलन आणि ११ ते १२ श्रद्धांजली सभा असे आयोजन संपूर्ण कोकण महामार्गावर ठिकठिकाणी केलेलं आहे.

कोकणवासियांना दर्जेदार महामार्ग मिळविण्यासाठी आणि दर्जेदार महामार्ग तयार होण्यापूर्वी कोकण महामार्ग प्रवासासाठी योग्यरीतीने ठेवण्यासाठी मानवी साखळी जन आंदोलन तर आजपर्यंत महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अनेक जण अपघातग्रस्त होऊन मृत्युमुखी पडले त्यांच्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दुरावस्थेत असलेला महामार्ग त्वरित प्रवासासाठी सुखकर कसा होईल? ह्यासंदर्भात प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. हा महामार्ग पुढील दोन वर्षात ठरल्याप्रमाणे वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे आणि तो दर्जेदार असायला पाहिजे. हजारो बळी घेणारी धोकादायक वळणे आणि घाट शक्य तितका सोपा करून स्थानिक गावकऱ्यांना, शिक्षण संस्थांना, विद्यार्थ्यांना आणि त्या-त्या हायवेवरच्या गावातील प्रवाशांना, किमान सुरक्षितता मिळावी याकरिता अंडरपास आणि गाड्या पलिकडे जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था शासनाने करावी.

याकरिता कोकणातील सामाजिक संस्थांचे आणि जनतेचे आपल्या हक्कांसाठी आणि दर्जेदार कोकण महामार्गासाठी भव्य कोकण महामार्ग जनआंदोलन होणार आहे. गेल्या अकरा वर्षात जे हजारो कोकणवासिय अपघातामध्ये या हायवेवर मृत्युमुखी पडले त्या दुर्दैवी बांधवांसाठी श्रध्दांजली मानवी साखळी आंदोलनाचा त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रातले सगळे हायवे बांधून पूर्ण झाले; परंतु गेली अकरा वर्ष पनवेल ते इंदापूर आणि सहा वर्ष इंदापूर ते झाराप काम सुरु आहे. देशातील सर्वात संथ कामाचा विश्वविक्रम होईल; अशी टीका आता कोकणवासिय करू लागले आहेत. दरवर्षी विशेषतः पावसाळ्यात या महामार्गावर प्रचंड खड्डे पडतात आणि अनेक ठिकाणी या महामार्गाची पायवाट होते. हा देशातील एक प्रमुख धोकादायक हायवे म्हणून कोकण महामार्ग ओळखला जातो दरवर्षी शेकडो प्रवासी आणि कोकणवासियांचा प्राण येथे अपघातामुळे जातात.

कोकण हायवे समन्वय समितीतर्फे कोकणवासियांच्या काही मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत…

१) दर्जेदार आणि खड्डेमुक्त महामार्ग ठरल्याप्रमाणे पुढील दीड वर्षात पूर्ण व्हावा.

२) अपघाताला निमंत्रण देणारी आणि धोकादायक वळणे आणि घाट मार्ग शक्य असतील तितके सरळ करावे.

३) सर्वात जास्त गर्दीचा इंदापूर ते माणगाव पहिला शंभर किलोमीटरचा टप्पा सहा पदरी करावा.

४) कंटनेरसाठी स्वतंत्र एक लाईन ठेवावी आणि हा रस्ता डांबराचा बदलून सिमेंटचा करावा.

५) कोकण हायवेचा पहिला टप्पा शंभर किलोमीटर संपूर्ण सर्विस रोड असावा. भविष्यात या संपूर्ण हायवेला स्थानिकांच्या सोयीसाठी संपूर्ण सर्विस रोड असावा.

६) हायवे पूर्ण झाल्याशिवाय टोल सुरु करु नये.

७) या हायवे निर्मितीला अक्षम्य विलंब आणि कोकणवासियांना झालेला व्यवसायिक, आर्थिक आणि मानसिक त्रास यामुळे MH06, MH08, MH07 रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हयातील स्थानिक रहिवाशांच्या गाड्यांना टोल लावू नये.

८) हायवेवरील प्रमुख गावे आणि शिक्षण संस्था गावकरी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित पलिकडे जाण्यासाठी अति आवश्यक तिथे अंडरपासची व्यवस्था करावी.

९) हायवेवरील खारपाडा सारखे गर्दीचे नाके जिथे आत मध्ये ४०-५० गावे आहेत तिथे गाड्या थेट हायवेवर येऊ नयेत; पलीकडे जाण्यासाठी अंडरपास आणि सर्विस रोड अत्यंत आवश्यक आहेत.

१०) हायवेवर दर २५ किलोमीटर अंतरावर स्थानिक शेतकऱ्यांना आपली कृषी उत्पादने विकता यावेत म्हणून शेतकरी बाजारसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हावीत.

११) हायवेवर आवश्यक तिथे ठराविक अंतराने चांगले व्यवस्थापन असलेली सुलभ शौचालय स्वच्छतागृह असावीत.

१२) जगातील सर्वात समृध्द जैवविविधता सह्याद्रीमधून हा रस्ता जातो. म्हणून सह्याद्रीतील सर्व प्रकारची झाडे दर किलोमीटरला लावून जगातला सर्वात जास्त जैवविविधता असणारा निसर्गरम्य देखणा ग्रीन हायवे बनवावा.

१३) कोकणात पडणाऱ्या पावसाचा विचार न करता महाराष्ट्रातील अन्य भागांप्रमाणे धरण घातल्यासारखे, आजूबाजूचे डोंगर कुरतडून आणि घाट पोखरुन, भराव घालून यापुढे कोकणचा निसर्ग उध्वस्त करणारा चौपदरी हायवेचे डिझाईन यापुढे कोकणात वापरु नये. यावर्षीचा महाप्रलय आणि झालेला ढगफुटीचा विचार यापुढे नियोजन करताना केला जावा. पुढील काळात हायवे किंवा इतर विकास कामांच्या भरावासाठी नद्यांच्या डोहामध्ये भरलेला गाळ वापरण्यात यावा. डोंगर कुरतडले जाऊ नयेत. ५०० किलोमीटरचे धरण घातल्याप्रमाणे डिझाईन केलेला हायवे यापुढे कोकणात नको. डोंगर असेल तिथे बोगदा आणि दरी असेल तिथे पूल, यापुढील कोस्टल हायवे स्थानिक नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी दुपदरी असावा. जुन्या मुंबई-गोवा हायवेप्रमाणे कोकणातील रस्ते असावेत. कोस्टल महामार्ग हवा पण चौपदरी हवा असा आग्रह नाही. यापुढे मुंबईच्या आसपासच्या कोकणामध्ये जिथे औद्योगिक पट्टे आहेत आणि बंदरे आहेत तेथे कनेक्टिविटीसाठी चौपदरी रस्ते बनवावेत. अर्धा रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथे चौपदरी रस्त्यांची गरज नाही. कोकणची भौगोलिक रचना न बदलणारे चांगल्या दर्जाचे अधिक रुंद आणि दुपदरी निसर्गाशी फारशी हानी न करणारे रस्ते बनवावेत.

१४) याशिवाय एक मुख्य मागणी महाड आणि चिपळूण कोकणाच्या दोन मुख्य बाजारपेठा महापुरामध्ये उध्वस्त झाल्यात याकरिता येथील व्यापाऱ्यांना विशेष बाब म्हणून नुकसान भरपाई व वार्षिक चार टक्के व्याजदराने दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध व्हावे.

१५) गेली ४-५ वर्ष दोन वर्षात हायवे पूर्ण होणार अशी आश्वासने मिळत आहे. परंतु प्रत्यक्ष हायवेचे काम नजिकच्या भविष्यात पूर्ण होताना दिसत नाही.

१६) कोकणच्या भौगोलिक स्थितीचा विचार न करता व पाणी इकडून तिकडे पलीकडे कसे जाईल याचा विचार करता धरण बांधावे; अअशा पध्दतीने अनेक ठिकाणी भराव घातल्यामुळे महापूराला निमंत्रण देणारा हा हायवे बनत आहे. कोकणात प्रचंड गाळाने भरलेल्या नद्या साफ करुन तो गाळ हायवेच्या भरावासाठी वापरणे अभिप्रेत असताना आजूबाजूचे डोंगर पोखरुन मोठमोठे भराव निर्माण केल्यामुळे अति पावसामुळे हे डोंगर कोसळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जुना हायवे जशाच्या तसा मोठा केल्यामुळे अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आणि घाट तसेच आहेत ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात अपघात होणार आहेत.

१७) हायवेवरील अनेक मोठी गावे आणि शिक्षण संस्था गावकऱ्यांना किंवा विद्यार्थ्यांना पलीकडे जाण्यासाठी अंडरपास व अन्य सुरक्षेच्या व्यवस्था हव्यात, त्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपघात भविष्यात संभवतात.

१८) हा महाराष्ट्रातील सर्वात बिझी हायवे आहे आणि देशातील सर्वात मोठी दोन बंदरे जेएनपीटी आणि दिघीसोबत जयगड बंदर या महामार्गावर आहेत, यासाठी कंटेनर वाहतूक असल्यामुळे पनवेल ते माणगाव सहापदरी हायवे व स्थानिक वाहने चालवण्यासाठी दोन्ही बाजूला सलग सर्विस रोड आवश्यक असताना; या सुविधा निर्माण केल्या गेल्या नाहीत. आज हा देशातील सर्वात धोकादायक हायवे बनला आहे.

१९) अनेक ठिकाणी मातीच्या भरावाचे पूल टाकल्यामुळे गावांचे दोन भाग झाले आहेत. या काही ठिकाणी साईडचे अरुंद सर्विस रोड असल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.

२०) या हायवेवर जिथे आतल्या बाजूला ३०-४० गावे आहेत आणि तिथून मुख्य रस्ता हायवेवर येतो; या अपघातप्रवण जागांवर गाड्या पलीकडे जाण्यासाठी गाड्यांचे अंडरपास व सुरक्षित सर्विस रोड आवश्यक आहेत. काही ठिकाणी हे झालेले नाही. ठराविक ठिकाणी ७०-८० टक्के हायवे पूर्ण झाले आहे. या ठिकाणी टोल नाके बांधण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

ह्या सर्व मागण्या कोकणवासियांसाठी अत्यंत महत्वाच्या असून कोकण विकासाठी महत्वाच्या आहेत. कोकण हायवे समन्वय समितीने मुंबईसह कोकणातील अनेक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ह्या आंदोलनाचे नियोजन केले असून सदर आंदोलनाला नक्कीच यश मिळेल आणि कोकणवासियांच्या मागण्या पूर्णत्वास जातील; अशी कोकणवासियांची अपेक्षा आहे.