सिंधुदुर्गातील दोडामार्ग कळणेचा राक्षसरूपी मायनिंग पुन्हा सुरु, जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची टोपली!

सिंधुदुर्ग (कोकणचा तडाखा न्यूज – आबा खवणेकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंगमधील उत्खनन पुन्हा सुरु झालं आहे. ८ महिन्यांपूर्वी २९ जुलै रोजी कळणे मायनिंगमधील साठवणूक केलेल्या पाण्याचा बांध फुटून कळणे गावात मोठे नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत नाही, तोपर्यंत उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मायनिंग सुरु करण्यात आलं आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात कळणे मायनिंगमधील साठवणूक केलेल्या पाण्याचा बांध फुटला. परिणामी कळणे गावात मोठं नुकसान झाले. या खनिजयुक्त पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की गावातील काजू, नारळ, केळी, सुपारीच्या बागा आणि भातशेती पूर्णत: वाहून गेली होती. जमिनीची खूप मोठी धूप झाली होती. तर अनेक घरात दूषित पाणी शिरल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. यावेळी प्रशासनाने पंचनामे करुन एक कोटी ३४ लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचे आदेश मायनिंग कंपनीला दिले होते. तोपर्यंत कळणेमध्ये होत असलेले मायनिंग बंद ठेवण्याचे आदेश देखील दिले होते. मात्र आज ८ महिने होऊन देखील मायनिंग कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई देण्यात आली नाही. नुकसान भरपाई मिळण्यासाठी कळणेवासियांनी काही दिवसांपूर्वी प्रांत कार्यालयावर गुराढोरांसह आंदोलनही केलं होतं. तरीदेखील मायनिंग कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

बांध फुटल्यानंतर खासदार, आमदार यांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी देखील केली होती. यावेळी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देईपर्यत मायनिंग बंद ठेवण्याचे आदेश कंपनीला दिले होते. मात्र तब्बल ८ महिने होऊन देखील मायनिंग कंपनीकडून नुकसान भरपाई तर सोडाच प्रशासनाच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवली आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र यावर बोलण्यास नकार दिला आहे.

दरम्यान मायनिंग कंपनीच्या लॉबीने महाराष्ट्र सरकारमधील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना भेटून मायनिंग सुरु करण्याची परवानगी मिळवल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केला आहे. तर नुकसान भरपाई दिली नाहीतर १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.