सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय कला उत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.20 (जि.मा.का): माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कला उत्सवासाठी जिल्हास्तरीय स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले असल्याची, माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य सुशिल शिवलकर यांनी दिली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रज्ञलय, नवी दिल्ली यांच्या मार्फत सन 2015-16 पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन 2023-24 मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन, शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, व्दमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प व खेळणी तयार करणे व नाट्य (भूमिका अभिनय) या 10 कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. राज्याच्या 10 कला प्रकारातून प्रत्येकी 1 विद्यार्थी व 1 विद्यार्थ्यीनी अशा 20 विद्यार्थ्यांचा संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ऑनलाईन कला उत्सवासाठी अंदाजे 10 डिसेंबर 2023 पर्यंत नामनिर्देर्शित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये प्रत्यक्ष स्वरुपात स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

जिल्हास्तर कला उत्सव स्पर्धेचे प्रत्यक्ष स्वरुपात आयोजन दि. 26 ऑक्टोबर 2023 या दिवशी करण्यात येणार आहे. कला उत्सवामध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इ.9 वी ते 12 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष आणि या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना https://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामंधील विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली माहिती https://forms.gle/d6pSXPWxHGcadwgW7 गुगल लिंकमध्ये भरण्यात यावी. दि. 26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता न्यु इंग्लिश स्कुल, कसाल ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे स्पर्धा होणार आहे.

अधिक माहितीसाठी अधिव्याख्याता बी.एस. कांबळे मो.नं.9730248149, श्रीमती मानसी देसाई, मो.नं.8208638835, श्रीमती. वैशाली नाईक मो. नं.9529864178 जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्याशी संपर्क साधावा. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी कला उत्सवामध्ये सहभाग घेण्यात यावा असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य सुशिल शिवलकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी केले आहे.