अतिदुर्मिळ `बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्त गटाच्या पंकज गावडे यांनी वाचविले महिलेचे प्राण!

सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- अतिदुर्मिळ रक्तगटाच्या पंकज गावडे यांनी रक्तदान करून मालवण हिवाळे येथील लक्ष्मी नारायण गावडे ह्या महिलेचे प्राण वाचविले. यापुर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पंकज गावडे यांचे बॉम्बे रक्तगटाचे रक्त विशाखापट्टणम येथे रवाना करून तेथील रुग्णाचे प्राण वाचविले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॉम्बे ब्लडग्रुपच्या रूग्णाला देण्यात आलेले हे पाहिलेच रक्तदान असून जे रुग्णाला कुठेही न हलवता किंवा रक्तदात्याला जिल्ह्याबाहेरून न आणता यशस्वीरीत्या पंकज गावडे यांच्या रूपाने केले गेले.

मालवण हिवाळे येथील लक्ष्मी नारायण गावडे ह्या महिलेला हिमोग्लोबीनच्या कमतरतेमुळे रक्ताची गरज होती. रुग्णाची रक्त तपासणी केली असता रक्तचाचणीमध्ये रुग्णाचे रक्त ओ पोजीटीव्ह किंवा ओ निगेटिव्ह सुद्धा आढळत नव्हते. नंतर रक्तपेढीचे तंत्रज्ञ श्री.सुमित मुकादम श्रध्दाली बिले आणि वरदा गाडगीळ या टीमने सदरच्या रक्तनमुन्याची सखोल तपासणी केली असता सदर महिला रुग्ण बॉम्बे रक्तगटाची असल्याचे निदर्शनास आले. बॉम्बे ब्लड ग्रुप हा अतिदुर्मिळ रक्तगट असून या रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात.

अशा परिस्थितीमध्ये अत्यावश्यक रक्ताची दुर्मिळता लक्षात घेऊन रुग्णाच्या नातेवाईकांना मानसिक दडपण येऊ नये म्हणून SSPM लाईफटाईम हॉस्पिटलचे डॉ. बावणे यांनी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर आणि सहखजिनदार अमेय मडव यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी तातडीने मालवणचे सुपुत्र तथा बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्तदाते पंकज संतोष गावडे यांना संपर्क केला. पंकज गावडे हे देखील तात्काळ सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रकाश तेंडोलकर आणि कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक आणि नियमित प्लेटलेट डोनर यशवंत गावडे यांच्यासोबत SSPM हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रक्ताच्या सर्व अत्यावश्यक तपासण्या झाल्यानंतर श्री. पंकज गावडे (मालवण) यांनी अमूल्य आणि सर्वात दुर्मीळ असे रक्तदान केले आणि त्यानंतर सदर रुग्णाची अन त्याच्या नातेवाईकांची सिंधु रक्तमित्रच्या टीमने प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर माहीती देऊन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान आपल्या सोबत असल्याचा धीर दिला.

यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, सचिव किशोर नाचणोलकर SSPM लाईफटाईम हॉस्पिटलचे डीन डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. गोपाल, डॉ. आविष्कार, रक्तपेढीचे डॉ. बावणे सर, कुडाळ-वेंगुर्ला विभागीय संघटक आणि नियमित प्लेटलेट डोनर श्री यशवंत गावडे, रक्तपेढीचा स्टाफ आदि मान्यवर उपस्थित होते.

पंकज यांच्या जीवनदायी कार्याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

ह्या दुर्मिळ रक्तगटाचा शोध सर्वप्रथम मुंबईतील केईएम रुग्णालयात लागला होता. रुग्णालयातील डॉ. वाय. एम. भेंडे यांनी १९६२ मध्ये हा शोध लावला. मुंबईत शोध लागल्यानं ‘बॉम्बे ब्लड ग्रूप’ असं त्याचं नामकारण करण्यात आलं होतं. आता जगभरात याच नावानं तो रक्तगट ओळखला जातो. ‘अँटीजन एच’ या घटकामुळं हा रक्तगट इतर गटांपेक्षा वेगळा ठरतो. हा रक्तगट असलेल्या व्यक्तीचे रक्त इतरांना चालू शकते. मात्र, इतर व्यक्तींचे रक्त ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असलेल्या व्यक्तीला चालत नाही. केवळ तो रक्तगट असलेल्या व्यक्तीच त्यास रक्त देऊ शकतात.

You cannot copy content of this page