गिरणी कामगारांना विविध घरकूल योजनेतून घरे देणार-मुख्यमंत्री

गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई:- मुंबईतील गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न गेले काही वर्ष प्रलंबित असला तरी सर्व गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाद्वारे शासनाच्या विविध घरकूल योजनेतून गिरणी कामगारांना घरे देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

सह्याद्री अथितीगृह येथे गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळाने गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मिलींद म्हैसकर व गिरणी कामगार संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत तयार होणाऱ्या घरांमधील काही घरे गिरणी कामगारांना देणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीतील एमएमआरडीएची घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. म्हाडामधूनही लॉटरी पद्धतीने गिरणी कामगारांना घरे देण्यात येतील.

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे शासनाच्या तयार असलेल्या घरामधूनही काही घरे गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत. गिरणी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल व कामगार विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध घरकूल योजनांमधूनही कालबद्ध कार्यक्रमातून गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी शासन प्रयत्नशिल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *