सिंधुदुर्ग माझा- सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षकांनी सावध राहीले पाहिजे!

भ्रष्ट युतीतून निर्माण झालेली राक्षसी यंत्रणा घातक;
सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षकांनी सावध राहीले पाहिजे!

लाच घेताना दोडामार्गमधील वाहतूक पोलीस राजेंद्र उर्फ राजा राणे पकडला गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तसेच अवैध धंद्याशी संबधित असणाऱ्या सर्व पोलिसांना गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री यांनी कारवाईचा इशारा दिला.

किमान ह्या दोन बातम्यांचा वेध घेताना अनेक गैरगोष्टी समोर येतात. सिंधुदुर्ग पोलीस दलाला भ्रष्टाचाराचा काळीमा फासणाऱ्या ह्या घटना थांबतील; अशी आशा करणे म्हणजे वेडेपणाचे ठरेल. कारण जिल्ह्यातील राजकारणातून उदयास आलेली ठेकेदारी असो वा ठेकेदारीतून उदयास आलेले राजकारण; ह्या दोघांना म्हणजे ठेकेदारांना आणि राजकारण्यांना वरदहस्त असतो तो शासकिय अधिकाऱ्यांचा! ह्या त्रिकुटांच्या भ्रष्ट युतीमधून जी यंत्रणा जन्मास येते त्याच यंत्रणेतून गैरव्यवहार, भ्रष्टाचार अनैतिकता फोफावते. सामान्य माणसांवरील अन्याय सहजपणे केले जातात. त्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद सामान्य जनतेमध्ये नसते. परिणामी ह्या त्रिकुटांच्या युतीतून निर्माण झालेली भ्रष्ट राक्षस यंत्रणा कायदे धाब्यावर बसविते, गुंडशाहीला प्रोत्साहन देते आणि सामान्य जनतेला हतबल बनविते. जर ह्या राक्षसी यंत्रणेमध्ये स्वच्छ पारदर्शक, प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी, राजकिय पुढारी किंवा ठेकेदार आला तरी त्याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने नाहक त्रास देऊन बाजूला केले जाते. म्हणूनच जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी केलेली कारवाई जरी समर्थनीय-योग्य असली तरी त्यांच्या बदलीची वेळ जवळ आली आहे, असे आम्हाला वाटते. प्रामाणिक अधिकारी जास्त वेळ एका ठिकाणी राहता कामा नये; ह्याची दक्षता अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत घेतली जाते.

सिंधुदुर्गातील पोलीस दलाची कामगिरी नेहमीच सुमार दर्जाची राहिली आहे. कारण राजकिय नेत्यांचा आणि ठेकेदारांचा पोलिसांवर असणारा जबरदस्त दबाव. अगदी एखाद्या गावातील-वाडीतील एखादे प्रकरण जेव्हा पोलीस ठाण्यात येते तेव्हा सुद्धा राजकिय नेता आणि तपास अधिकारी यांचे संगनमत होते. त्यातून सामान्य मनुष्य न्यायाची अपेक्षा ठेऊ शकत नाही.

जिल्ह्यामध्ये वाळूची, चिऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तेव्हा नियमांचे तंंतोतंत पालन होत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला चलती येते. आर्थिक व्यवहार करून म्हणजेच लाच घेऊन अधिकारी वर्ग आपले कार्य साधतात. अवैद्य व्यवसायावर एखादी धाड घालून तिला प्रसिद्धी द्यायची आणि बाकी ‘चोरीचा मामला’ तसाच सुरु ठेवायचा, हे काही नवे नाही.

आजही अवैद्य दारू विकली जाते, मटका जुगार सुरु आहेत. अनेक ठिकाणी चोऱ्या होताहेत आणि आकास्मित मृत्यूची नोंद करून पोलीस खुन्याच्या गुन्हांचा तपास `फाईल बंद’ करून ठेवतात. हे काही आताच चाललंय असं नाही. हे सर्व उघड सत्य सर्वांना माहित आहे. पण राजकारणातील नेते, ठेकेदार आणि अधिकारी यांची भ्रष्ट युतीने तयारी झालेली ‘राक्षसी यंत्रणा’ नेहमीच वरचढ ठरते.

जिल्ह्यामध्ये अनेक पोलीस स्टेशनला अनेक पोलीस अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कसे काय राहतात? त्यांना जरा दुसऱ्या जिल्ह्यात पाठवा. पण ते होत नाही.

मटका जुगारामधून अनेक पिढ्या बरबाद झाल्या. मटका जुगारासाठी अस्तित्वात असलेली संपूर्ण यंत्रणा पोलीस अधिकाऱ्यांना माहिती असते. पण मटका जुगार बंद होत नाही. कारण मटका जुगार चालविणारे पोलिसांना गप्प करण्यासाठी काय देतात? हे सर्वांना माहिती असतं. ह्या भ्रष्ट पोलिसांचा आधार घेऊनच जिल्ह्यातील अनेक मटकाकिंग ठेकेदार झाले. त्या ठेकेदारांकडून जाहिराती मिळतात म्हणून वर्तमानपत्रांमधून त्यावर काही छापून येत नाही.

आजही अनेक गावात दारूचे अवैद्य धंदे सुरु आहेत. त्यातील एक उदाहरण मुद्दाम पाहूया. कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठ्ठ्यावर अवैध दारू धंदा करणाऱ्याला पोलिसांनी दोनदा अटक केली. हा मनुष्य जिल्ह्याबाहेरील आहे. तरीही त्याचा अवैद्य दारूधंदा सुरु आहे. का? कारण तो तेथील एका पुढाऱ्याकडे रोजंदारीवर आहे. म्हणजेच तो पुढारी जामीन देऊन आपल्या कामगाराला सोडवितो व पुन्हा पुन्हा त्याच्याकडून अवैद्य दारू धंदा करून घेतो. त्याचा शोध पोलीस यंत्रणेला का लागत नाही? अशाप्रकारे जिल्ह्यात अनेक अवैद्य दारू धंदे सुरु आहेत. गोवा बनावटीची दारू आणणारी एक-दोन वाहने पकडून पोलीस स्वत:ची पाठ थोपटून घेतात. परंतु वर्षानुवर्षे अवैध दारूधंदे, मटका-जुगार चालविणाऱ्यांचे काहीही वाकडे होत नाही.

दोडामार्गामध्ये एका भ्रष्ट ‘राजा’ला लाचलुचपत खात्याने अटक केली. पण असे अनेक `राजा’ भ्रष्ट कारभार करून आपल्याकडील संपत्ती वाढवित आहेत. त्यात अनेक पोलीस अधिकारी आहेत, इतर प्रशासनातील अधिकारी आहेत.

जिल्हाचे पालकमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे राज्यगृहमंत्री आहेत. ते सुद्धा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची धमकी देतात. पण ह्या अधिकाऱ्यांवर त्यांचा पुर्वीही वचक नव्हता आणि आताही नाही. म्हणूनच जिल्ह्याला गृहराज्यमंत्री मिळूनही पोलीस यंत्रणा सुमार दर्जाची आहे. त्यासाठीच पालकमंत्र्यानी आणि सिंधुदुर्गवासियांनी पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांना पूर्णपणे पाठींबा द्यायला हवा. कारण त्यांचासारखा प्रामाणिक, कार्यक्षम अधिकारी भ्रष्ट यंत्रणेची मुळासकट छाटणी करू शकतो. अशा अधिकाऱ्यांची बदली होऊन उचलबांगडी केली जाते. पालकमंत्र्यांनी आणि सिंधुदुर्गातील जनतेते त्यासाठी पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या मागे उभे राहिलं पाहिजे! भ्रष्ट युतीतून कायद्याचा व सामन्यांचा बळी घेणारी राक्षसी यंत्रणा तयार होते व कार्यक्षम अधिकाऱ्यांचा बळी जातो, म्हणूनच पोलीस अधिक्षकांनी सावध राहीले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *