रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक!
ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारणार!
अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधणार!
रत्नागिरी (संतोष नाईक):- रत्नागिरी येथे २८ ऑक्टोबर रोजी ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यात रिक्षा चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रीकरण व समृद्धीसाठी सर्वांनी संघटित व्हावे; आवाहन मान्यवर वक्त्यांकडून करण्यात आले. ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्यात येणार असून अनेक समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधला जाणार आहे.
यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यावसायिक व पदाधिकारी हजर होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे रिक्षा चालक-मालक कृती समितीचे सरचिटणीस नितीन पवार, तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे सचिव सुधीर पराडकर उपस्थित होते.
सभेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातील बहुतेक सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक यांनी आपले विचार मांडले व व्यवसायाला येणाऱ्या प्रमुख अडचणी मांडल्या. रिक्षा चालक मालक यांना संबोधित करताना श्री. सुधीर पराडकर यांनी आज मितीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा व राज्यस्तरीय झालेल्या कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच कोरोना कालावधीत मुंबईवरून ट्रान्सफर होऊन आलेले रिक्षा परवाना रद्द करणे, नवीन परवाना बंद करणे, तसेच आठ वर्षावरील परवाना अट रद्द करून पंधरा वर्षे करणे, तसेच आरटीओ ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांची संख्या वाढलेली आहे, यावर आवाज उठविणे इत्यादी मुद्दे मांडत मार्गदर्शन केले.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशनला रिक्षा स्टँड मंजूर करणे, त्याचप्रमाणे नोकरीमध्ये असलेल्या व निवृत्त झालेल्या कामगारांचे रिक्षा परवाने रद्द करणे का महत्वाचे आहे हे सांगून आरटीओ संबंधित येणाऱ्या अडचणीवर कशी मात करावी? याचे बहुमूल्य मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सभा घेऊन त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून रिक्षा संबंधित निर्णय घेण्यात यावे; अशी आग्रही मागणीही त्यांनी केली. रिक्षा संघटनेत काम करताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम करावे व रिक्षा संघटनेचा काळा पिवळा झेंडा हाती घ्यावा; असे आवाहन केले.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव (दादा) पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या सहमतीने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून श्री प्रताप भाटकर यांची नेमणूक झाल्याचे संतोष नाईक यांनी जाहीर केले. सर्व रिक्षा चालक-मालक यांनी भाटकर यांचे अभिनंदन केले.
रिक्षा चालक-मालक कृती समितीचे पुणे सरचिटणीस नितीनजी पवार यांनी मार्गदर्शन करताना २०१४ सालच्या अहवालाप्रमाणे रिक्षा चालक-मालक कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी व्हावी; असे सांगितले. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना रिक्षाचालकांच्या महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात यावे, असे सुचविण्यात आले. त्याचप्रमाणे रिक्षा परवाने ताबडतोब बंद करण्यात यावेत, सीएनजी कमी दाबाने मिळत असल्यास वजन माप विभागाकडे निवेदन देऊन गॅस मापाची यंत्रणा उपलब्ध करून द्यावी; महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात जिल्ह्यात सर्व रिक्षा चालक मालक यांची परिषद घेऊन जनजागृती करावी, मीटरसाठी मीटर ॲप वापरण्याची परवानगी द्यावी; अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, या जिल्ह्यातील रिक्षाचालकांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक-मालक यांचा संयुक्त मेळावा रत्नागिरीमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर तसेच त्यांचे सहकारी खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी शहर, लांजा, राजापूर या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक मालक यांनी मेहनत घेतली व मेळावा यशस्वी केला.