शिक्षण संस्थेचे ऋण फेडणे हे सर्वात मोठे पुण्य! -श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या माजी विद्यार्थीनी सुप्रिया राणे

देवगड (प्रतिनिधी):- “आपण ज्या शिक्षण संस्थेत शिकलो त्या शिक्षण संस्थेचे ऋण फेडणे हे सर्वात मोठे पुण्य असते.” असे विधान सुप्रिया शांताराम राणे (पुर्वाश्रमीच्या नंदा मुकुंद वेंगुर्लेकर-तांबळडेग) यांनी काढून क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई संचलित मिठबावच्या श्री रामेश्वर हायस्कूल शैक्षणिक सुविधेसाठी रोख पाच हजार रुपये भेट म्हणून दिले.

आपण ज्या ज्ञानमंदिरात शिकलो आणि ज्ञानवंत झालो त्या ज्ञानमंदिराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी सदैव सहकार्य केले पाहिजे; असू सांगून सुप्रिया राणे यांनी नियोजित सांस्कृतिक हॉलवर शेड बांधण्यासाठी आपल्यासह इतर माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी मित्रमंडळींकडून भरीव निधी उभारण्याचा संकल्प सोडला. सुप्रिया राणे सायन हॉस्पिटलमध्ये सेवाभावी कार्य करत आहेत.

यावेळी सहायक प्रशासकीय अधिकारी वित्त भालचंद्र चव्हाण, मुख्याध्यापक आर. आर. राऊत, अमित पवार इत्यादी उपस्थित होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज, मुंबईचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांनी तसेच सहाय्यक प्रशासकीय अधिकारी प्रशासन एम. के. लोके यांनी सुप्रिया राणे यांचे आभार मानले.

सुप्रिया राणे यांची श्री रामेश्वर हायस्कूल मिठबावच्या १९८१ बॅचच्या माजी विद्यार्थीनी प्रमुख म्हणून निवड

सुप्रिया राणे यांचे मनोगत:-
“आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे- संस्थेचे मोठे ऋण आपल्यावर असतात. ग्रामीण भागात डॉ. शिरोडकर यांनी जे रोप लावले, त्याच्या विस्तारासाठी आपण खारीचा वाटा उचलला पाहिजे. ग्रामीण भागातील आपल्यासारख्या माजी विद्यार्थ्यांनी- शिक्षणप्रेमींनी वस्तू किंवा आर्थिक स्वरूपात जर सहकार्य केले तर आज शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. शाळेच्या विकासासाठी आपण सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊया. आपण आपल्या शाळेत येऊन गेटटूगेदर करू आणि शाळेला सहकार्य करीत शाळेचे ऋण फेडू! शिक्षकांमुळे माझ्यासारखी विद्यार्थ्यांनी मोठ्या पदावर पोहचली. आपण खूपजण वेलसेटल झालो आहोत. आता आपण एकत्र येऊ आणि `माझी शाळा-माझा वाढदिवस’ उपक्रम राबवून शाळेला मदत करू! यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आपला संपर्क क्रमांक द्यावेत! ” असे आवाहन सुप्रिया राणे यांनी केले.