निवृत्ती वेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्वरीत हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी:- जिल्हा कोषागार कार्यालय येथे डिसेंबर अखेर पर्यंत हयातीचे दाखले स्विकारले जात होते, तरीही अद्याप 583 निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी हयातीचे दाखले सादर न केल्याने त्यांचे निवृत्तीवेतन रोखण्यात आले असून अश्या निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्ती वेतनधारकानी त्वरीत जिल्हा कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालय येथे जाऊन हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
राज्यशासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी ज्या बँकेतमधून निवृत्तीवेतन स्विकारत आहेत त्या बँकेत अथवा जवळच्या कोषागार, उपकोषागार कार्यालयात दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जाऊन हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मोहिम राबविण्यात आली होती.
ही सुविधा ‘जीवनप्रमाण’ या वेबसाईटवर सुध्दा ऑनलाईन पध्दतीनेही उपलब्ध आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांनी कोषागार कार्यालयास न कळविता परस्पर बँक शाखा बदलली आहे अशा निवृत्ती वेतनधारकांनी जिल्ह्यातील नजीकच्या उपकोषागार, कोषागार कार्यालय येथे संपर्क साधावा. ज्या राज्य शासकीय कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे वय वर्षे 80 पूर्ण झाले आहे आणि अद्याप अतिरिक्त निवृत्ती वेतनाचा लाभ प्राप्त झालेला नाही अशा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी जन्मदिनांकाचा पुराव्यासह (जसे जन्म दाखला, आधारकार्ड,पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ. यापैकी एक) निवृत्तीवेतन शाखा, जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे टपालाद्वारे अथवा pension1501@gmail.com ई मेलवर अर्ज सादर करावेत.