कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची बनवाबनवी आणि भूखंडधारकांची छळवणूक!

भूखंडाचा ताबा नसतानाही इमारत बांधण्याचे करार करून फसवणुकीची शक्यता!

मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत- प्रभावळकर भूखंड धारकांना न्याय मिळवून देणार!

मुंबई (विशेष प्रतिनिधी):- गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे गरजू व्यक्तींना बाजारभावाप्रमाणे शुल्क आकारून घरकुलासाठी २०११ साली भूखंड वितरित केले. त्यातील अनेकांनी नोंदणीकृत करारनामा करून रीतसर मुद्रांक शुल्क भरले; एवढेच नाहीतर दरवर्षी भुईभाडेही देत असताना गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अधिकारी भूखंड धारकांशी बनवाबनवीचा खेळ खेळत असून अक्षरशः गेली १२ वर्षे त्यांची छळवणूक केली जात आहे.

भूखंड धारकांनी आपली कैफियत संबंधित विभागाकडे व लोकप्रतिनिधींकडे मांडली. खासदार- आमदारांनी ह्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला; तरीही टोलवाटोलवी करण्याची कुवृत्ती संबंधित खात्याने सोडली नाही. त्यामुळे आजही भूखंडधारकांना भूखंडाचा ताबा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत काही दलाल अधिकाऱ्यांच्या संगनमताने वास्तुविशारद (Architect) व विकासक (Developers) यांच्याशी करार करून घेण्यास भूखंडधारकांना गळ घालत आहेत. तर काहींनी असे करार केले आहेत.

भूखंड ताब्यात नसताना वास्तुविशारद (Architect) व विकासक (Developers) यांच्याशी करार करणे म्हणजे घोर फसवणूक असल्याची जाणीव काही भूखंड धारकांना झाली. भूखंडधारकांच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नुकतीच मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांची काही भूखंड धारकांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांनी भूखंड धारकांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन दिले. तेव्हा भूखंडधारकांचे प्रतिनिधी मुग्धा सावंत, किसन सावंत, मनोहर मर्गज, उदय ओटवकर, संतोष रोगे, देसाई तसेच पा. `स्टार वृत्त’चे संपादक – पत्रकार नरेंद्र हडकर, सहसंपादक मोहन सावंत उपस्थित होते.

(या प्रश्नांसंबंधी सविस्तर लेख लवकरच पाक्षिक `स्टार वृत्त’च्या ईपेपर व संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल; ह्याची नोंद घ्यावी!)

You cannot copy content of this page