दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसात मंजुरी!

मुंबई:- दुष्काळी जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत कामे सुरु करा, तीन दिवसात या कामांना मंजुरी द्या, असे निर्देश आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

दुष्काळाची स्थिती आणि उपाययोजना यासंदर्भातील संवादामध्ये आज मुख्यमंत्र्यांनी ऑडियो ब्रीजच्या माध्यमातून अहमदनगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला. वर्षा या शासकीय निवासस्थानी यावेळी राज्याचे मुख्य सचिव यु.पी.एस. मदान, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

2018 च्या लोकसंख्येप्रमाणे अतिरिक्त टॅंकरची मागणी

रोजगार हमी योजनेंतर्गत कामाची मागणी करणारे प्रस्ताव प्रलंबित ठेऊ नका, त्यांना तत्काळ मान्यता देऊन कामे सुरु करा, अशा सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, यासंबंधीच्या कामाचा अहवाल पाठविण्यात यावा. नरेगामध्ये 28 प्रकारची कामे कन्व्हर्जनच्या माध्यमातून करता येतील, सरपंचांनी याअंतर्गत जलसंधारणाची अधिकाधिक कामे आपल्या गावात करावीत. तहसीलदारांनी गावातील 2018 ची लोकसंख्या आणि जनावरांची संख्या विचारात घेऊन अतिरिक्त टँकरची मागणी पडताळून पहावी व त्याप्रमाणे टँकरद्वारे पाणीपुरवठा होईल याची दक्षता घ्यावी.

दुष्काळी कामांना आचारसंहिता नाही

पाणीपुरवठा योजनांची थकीत वीज देयके शासनाच्यावतीने भरण्यात यावीत, या कारणामुळे बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरु कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत.

तलावातील गाळ काढण्यास तत्काळ मान्यता द्या

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या माध्यमातून तलावांमधील गाळ काढण्यास तहसीलदारांनी तत्काळ मान्यता द्यावी, चारा छावण्यांच्या अडचणी प्रशासनाने दूर कराव्यात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी रोहयोंतर्गत कुशल कामांसाठी लवकरच निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिर मालकाला अधिकचा मोबदला देण्यात येत असल्याची माहिती ही त्यांनी दिली. तात्काळ करावयाच्या उपाययोजनांवर 48 तासात कार्यवाही करताना जिल्हा प्रशासनाने या संवादात सूचविण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजना नोंदवून घ्याव्यात व त्याची पडताळणी करावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या प्रभावी उपाययोजना-मुख्यमंत्री

अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ निवारणाच्या अनेक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या बैठकीत दिली. या उपाययोजनांचे स्वरूप असे:-

जिल्ह्यातील 13 तालुक्यात 772 टँकरने पाणीपुरवठा सुरु

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात 4 नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती.

54 विहिरींचे अधिग्रहण

पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची 10.49 कोटी रुपयांच्या थकित वीज देयकाची रक्कम भरून पाणीपुरवठा सुरळित करण्यात आला.

जिल्ह्यात 7 तालुक्यात 493 शासकीय चारा छावण्या. यामध्ये 2 लाख 67 हजार 574 मोठी तर 41 हजार 917 लहान अशी मिळून 3 लाख 09 हजार 491 जनावरे दाखल.

दुष्काळ जाहीर केलेल्या 11 तालुक्यातील 1275 गावातील 6 लाख 36 हजार 790 शेतकऱ्यांना 400.54 कोटी रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा.

जिल्हाधिकारी अहमदनगर यांना चारा चालकांची देयके अदा करण्यासाठी 47 कोटी रुपयांचा निधी वितरित.

जिल्ह्यातील एकूण 3 लाख 49 हजार 292 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाई पोटी 147.15 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात येणार आहे. त्यापैकी 90 कोटी रुपयांची रक्कम 1 लाख 65 हजार 449 शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील 2.72 लाख शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 58 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी 11.56 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात 886 कामे सुरु. त्यावर 7512 मजुरांची उपस्थिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *