महाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

नवी दिल्ली:- महाराष्ट्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ५ अंगणवाडी सेविकांची २०१७ -१८ च्या राष्ट्रीय अंगणवाडी सेविका पुरस्कारासाठी निवड झाली असून ७ जानेवारी २०१९ रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ अंतर्गत विविध कार्यक्रमांची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेंतर्गत कार्यक्रमांची उत्तम अंमलबजावणी करणाऱ्या देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांचा यात समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यात वरूड बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत कुरली अंगणवाडीच्या अर्चना सालोदे आणि टेंभुलखेडा अंगणवाडीच्या वनिता कोसे या अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा प्रकल्पांतर्गत येनसा अंगणवाडीच्या अंजली बोरेकर, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर प्रकल्पांतर्गत हनबरवाडी अंगणवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेती बंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी सेविकांची निवड झाली आहे.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ७ जानेवारी २०१९ रोजी येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *