खासदार श्रीरंग बारणे लिखीत ‘मी अनुभवलेली संसद’ पुस्तकाचे प्रकाशन
नवी दिल्ली:- खासदार श्रीरंग बारणे लिखीत ‘मी अनुभवलेली संसद’ या पुस्तकात संसदीय कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे, असा गौरव लेाकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केला आहे.
येथील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात श्रीमती महाजन यांच्या हस्ते खासदार बारणे लिखीत ‘मी अनुभवलेली संसद’ या मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन झाले याप्रसंगी त्या बोलत होत्या. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार सर्वश्री संजय राऊत, आनंदराव अडसूळ, तेलंगना राष्ट्रसमिती पक्षाचे नेते जितेंद्र रेड्डी, विविध राज्यातील पक्षाचे खासदार तसेच महाराष्ट्रातील खासदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती महाजन म्हणाल्या, बारणे यांचे लोकसभेतील कामकाज गौरवण्यासारखे आहे. त्यांनी सातत्याने विविध प्रश्नांद्वारे संसदीय कामकाजामध्ये भाग घेतला असून कार्यकुशल खासदारामध्ये त्यांची गणना होते. मी या अगोदरही त्यांच्या मतदार संघामध्ये चिंचवड येथे क्रांतिवीर चाफेकरांच्या टपाल तिकिटाचे अनावरण प्रसंगी गेले असता त्यांच्या मतदार संघातील कामही जवळून पाहिले आहे. केंद्र सरकारच्या पासपोर्ट कार्यालय निर्मिती पासून दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागात लाईट पोहोचविण्यापर्यंत त्यांनी केलेले काम, हिंदुस्थान अँन्टीबायोटिक्स या ऐतिहासिक कारखान्याच्या अडचणीच्या काळात त्यांनी केलेली मदतीची धडपडही जनतेसाठी झोकून देणाऱ्या लोकप्रतिनिधीचे काम श्री.बारणे प्रत्यक्ष कृतीतून करत आहेत.
केंद्र सरकारच्या अनेक योजनांची अंमलबजावणी कशा प्रकारे एका खासदाराने करावी लागते याची मांडणी केली असून सर्व सामान्य जनतेमध्ये सध्या लोकसभेच्या कामकाजाविषयी होत असलेला गदारोळ पाहता नाराजी पसरते या पुस्तकाच्या माध्यमातून इतर सदस्यांनीही बारणे यांचा चांगल्या कामाचा दाखला घ्यावा, असे श्रीमती महाजन यांनी सांगितले.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते म्हणाले, श्री.बारणे यांची काम करण्याची लोकसभेतील धडपड ही चळवळीतील तळमळीचा कार्यकर्ता अशी असून आजच्या प्रसंगी असलेली लोकसभा सदस्यांची उपस्थिती ही श्री बारणे यांनी संसदेत त्यांच्या स्वभावानी जमा केलेला ठेवा आहे. माझ्या एका सहकाऱ्याने संसदीय कामाकाजाच्या अनुभव असलेले पुस्तक लिहिले याचा सार्थ अभिमान असल्याचे श्री गीते म्हाणाले.
खासदार संजय राऊत म्हणाले, श्री.बारणे यांनी यापूर्वीही ३ पुस्तके लिहिली असून महाराष्ट्रातील एक मराठी खासदार दिल्ली मधील त्याच्या अनुभवलेल्या कामकाजा विषयी पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करतो ही कदाचित पहिली घटना असावी. बारणे यांचा नम्र स्वभाव, प्रचंड लोकसंपर्क, थोड्या कालावधीत संसदेमध्ये मिळवलेला अनुभव या माध्यमातून दिल्ली येथे श्री.बारणे यांनी कार्यकुशल खासदार म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली आहे. बारणे यांच्या पुस्तकातून लोकसभेचा कामकाजाचा उलगडा होत असून त्यांचे पुस्तक इतरांनी वाचावे अशा प्रकारचे पुस्तक असल्याचे असे श्री. राऊत म्हणाले.
केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनीही बारणे यांच्या मी या पुस्तकास शुभेच्छा दिल्या.
श्री.बारणे यांनी संसदीय कामकाजाची इथंभूत माहिती असलेले व त्यांच्या संसदेतील कामकाजाविषयीच्या अनुभवाविषयी आणि गेल्या साडे चार वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाच्या पाठपुराव्याविषयी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. या पुस्तकामध्ये अनेक छायाचित्रां सहित दाखले दिले आहेत. लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे या पुस्तकात संदेश आहेत. याच बरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यातील १९ खासदारांनी श्री.बारणे यांच्या कार्याचा गौरव या पुस्तकात केला आहे.