मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांना शपथ!
मुंबई:- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री झाले. अभूतपूर्व अशा महाशपथ विधी सोहळ्यात अलोट जनसागरासमोर उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथ विधी सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, द्रमुक नेते एम. स्टॅलिन, टी. आर. बालू, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उद्योगपती मुकेश अंबानी, निता अंबानी आदी मान्यवर आणि तीनही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.